होमपेज › Kolhapur › डॉक्टरांची 7,500 पदे रिक्‍त

डॉक्टरांची 7,500 पदे रिक्‍त

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 16 2018 9:53PMकोल्हापूर : एकनाथ नाईक

राज्यात डॉक्टर आणि कर्मचार्‍यांची सुमारे 20 हजार पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शासकीय रुग्णालयातील कामाचा अतिरिक्‍त भार कार्यरत व्यक्‍तींवरच पडतो आहे. जवळपास 7570 डॉक्टरांची पदे रिक्‍त आहेत. मे महिन्यात सुमारे 450 डॉक्टर वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरे कर्मचारी यामुळे शासकीय रुग्णालयातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत. 

राज्यात 50 हजार प्राथमिक आरोग्य केंद्रे, 8 हजार आरोग्य उपकेंदे, 23 जिल्हा रुग्णालये, 387 उपजिल्हा रुग्णालये रुग्ण सेवेत कार्यरत आहेत. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंतच्या सर्वसामान्य जनतेला सकारी रुग्णालयांमधून आरोग्य सेवा दिली जाते. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील डॉक्टरांची सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांची संख्या कमी झाली आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कमतरतेमुळे सरकारी रुग्णालयांमधून वेळेत उपचार करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक ठिकाणचा कार्यभार प्रभारी आणि ज्युनिअर डॉक्टर कर्मचार्‍यांवरच आहे. केंद्र सरकारने केंद्रीय आरोग्य सेवा संचालनालय, संरक्षण दल, वैद्यकीय सेवा, भारतीय रेल्वे वैद्यकीय सेवा, ऑर्डनन्स फॅक्टरी वैद्यकीय सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आरोग्य सेवा आदी ठिकाणच्या डॉक्टरांचे सेवा निवृत्तीचे वय 65 करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत अधिसूचना 5 जानेवारी 2018 रोजी काढली आहे. राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्‍न रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकार्‍यांचे निवृत्तीचे वय 64 करण्यात आले आहे. आरोग्य सेवा संचालनायासह संलग्‍न रुग्णालयांतील, जिल्हा परिषदांच्या आरोग्य सेवेतील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय 58 वर्षेच आहे. आरोग्य यंत्रणेवरील वाढता भार आणि  एकाच वेळी सेवा निवृत्त होणारे 450 डॉक्टर यामुळे वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याची भीती डोळ्यासमोर आवासून उभी आहे. त्यामुळे ही पदे भरण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.  

गरज आरोग्याच्या सुव्यवस्थेसाठी 
डॉक्टर व कर्मचार्‍यांची मिळून 72 हजार मंजूर पदे आहेत. त्यातील 20 जार 360 पदे रिक्‍त आहेत. यामध्ये 7570 डॉक्टरांच्या पदांचा समावेश असून महत्त्वाची बाब म्हणजे 466 विशेषतज्ज्ञ डॉक्टरांची पदेच भरलेली नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. आरोग्य सेवेचा बोजवारा उडण्याअगोदरच ही पदे तत्काळ न भरण्याची गरज आहे.