Fri, Apr 26, 2019 17:18होमपेज › Kolhapur › जिल्हा बँकेने रोखली 650 कर्मचार्‍यांची वेतनवाढ 

जिल्हा बँकेने रोखली 650 कर्मचार्‍यांची वेतनवाढ 

Published On: May 26 2018 1:18AM | Last Updated: May 26 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कामात अनियमितता, कर्जपुरवठ्याचे व ठेवी गोळा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण न करणे आदी कारणांवरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासनाने बँकेतील सुमारे 650 कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. उसाच्या बिलाअभावी ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडे पैसे नाहीत, त्यामुळे ठेवी गोळा करणे अडचणीचे ठरत आहे, अशात वेतनवाढ रोखल्याने कर्मचार्‍यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्‍त केली जात आहे. 

बँकेत ठेवी असल्याशिवाय कर्जपुरवठा करता येत नाही व बँक नफ्यात येऊ शकत नाही. बँकिंग स्पर्धेत टिकण्यासाठी बँकेचे स्वभांडवल हीच बँकेची संजीवनी असते. त्यासाठी प्रतिकर्मचार्‍याला 20 लाख ठेवी व चांगल्या ग्राहकांना कर्जवाटप असे उद्दिष्ट दिले होते. अन्य बँकांमध्ये ठेवी वाढत आहेत. मग जिल्हा बँकेत ठेवी का जमा होत नाही, असा सवाल काही दिवसांपूर्वी बँकेच्या कार्यक्रमात अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला होता. कर्मचार्‍यांनी ठेवी संकलन आणि कर्जपुरवठ्याचे उीद्दष्ट पूर्ण करावे, त्याशिवाय कोणालाही प्रमोशन मिळणार नाही, असा इशारा दिला होता. ज्यांचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही, त्यांनी ते पूर्ण करावे, अशी सूचनाही आ. मुश्रीफ यांनी केली होती. पण गेली पंधरा दिवस यामध्ये काहीच फरक पडला नाही. त्यामुळे बँक प्रशासनाने सुमारे 650 कर्मचार्‍यांच्या वेतनवाढी रोखल्या आहेत. 
वेतनवाढ रोखलेले कर्मचारी म्हणाले, की ठेवी संकलन, कर्जवाटप करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत; पण शेतकर्‍यांकडे पैसे नाहीत, साखर कारखान्यांनी बिले दिलेली नाहीत. त्यामुळे ठेवींचे प्रमाण कमी झाले आहे. लग्‍न समारंभामुळेही ठेवी काढून घेतल्या जात आहेत, अशा परिस्थितीत ठेवी संकलन कशा करायच्या? असा प्रश्‍न कर्मचार्‍यांना पडला आहे.