Sat, Nov 17, 2018 07:57होमपेज › Kolhapur › नांगनूरच्या केरूबाईनी बांधले शौचालय; तुम्ही आदर्श घेणार?

नांगनूरच्या केरूबाईनी बांधले शौचालय; तुम्ही आदर्श घेणार?

Published On: Jan 31 2018 2:15AM | Last Updated: Jan 31 2018 2:15AMनूल : अविनाश कुलकर्णी

देशात स्वच्छतेचा नारा घुमत असताना खेडोपाड्यात आजही विचित्र परिस्थिती आहे. कितीही प्रबोधन केले तरीही उघड्यावर शौचास जाणार्‍या लोकांची संख्या कमी झालेली दिसत नाही. हागणदारीमुक्‍त गावांचा पुरस्कार पटकावलेल्या अनेक गावांत अजूनही मुक्‍त हागणदारी सुरू आहे. अनेक लोक शौचालय बांधायला जागाच नाही अशी कारणे पुढे करून शौचालय बांधायचे टाळत आहेत, पण नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील 60 वर्षांच्या  महिलेने   महिलांसमोर  आदर्श ठेवला आहे.

आपल्या दोन मुलींसह केवळ 11 बाय 9 अशा छोट्याशा खोलीत अतिशय कष्टाने केरुबाई मोकाशीने संसार थाटला. पतीची साथ सोबत नसतानाही तिने आपल्या दोन्ही मुलींची लग्‍ने लावून दिली. सध्या त्या छोट्याशा खोलीत ती एकटीच राहते. ग्रामपंचायतीने घरोघरी जाऊन शौचालय बांधण्याची विनंती व शौचालयाचे महत्त्व सांगण्याचे काम सुरूच ठेवले होते. अनेकांनी ग्राम पंचायतीच्या विनंतीला ठेंगा दाखवला, पण 60 वर्षांच्या केरुबाईने आपल्या छोट्याशा खोलीत पाच बाय पाच फुटाचा शोषखड्डा मारून शौचालय बांधले. कोणतीही तक्रार आणि आढेवेढे न घेता केरुबाईने ग्रामपंचायतीच्या विनंतीला हिरवा कंदील दाखवला आणि काम पूर्णही केले. केरुबाईने केले ते इतरांना का जमत नाही, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आणि काहीतरी कारणे सांगून शौचालय बांधणे टाळणार्‍याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. 

केरुबाईंच्या या तळमळीला गटविकास अधिकारी सीमा जगताप, सरपंच विद्या लोहार, उपसरपंच विकास मोकाशी, ग्रामसेवक संदीप तोरस्कर, गट समनवयक विश्‍वजित पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनीही मोलाचे सहकार्य केले. प्रचंड इच्छाशक्‍ती असेल आणि त्याला प्रयत्नांची जोड मिळाली तर आपोआपच मदतीचे हात धावून येतात याचाच प्रत्यय नांगनूरमध्ये आला. काम तसं छोटच पण ज्या परिस्थितीत केरुबाईंनी केले हे निश्‍चितच आदर्शवत आहे.