Tue, Apr 23, 2019 00:18होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; टोळीला अटक

कोल्हापूर : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; टोळीला अटक

Published On: Aug 16 2018 1:37PM | Last Updated: Aug 16 2018 1:37PMशिये (कोल्हापूर) : वार्ताहर

वैद्यकीय विभागात शासकीय नोकरीचे आमिषाने  सुमारे चाळीस तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला शिरोली एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. फसवणुकीचा अकडा एक कोटी रुपयांच्या घरात असल्याचे पोलीस उपअधीक्षक  सुरज गुरव व सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

फसवणूक प्रकरणी विजय चव्हाण, हेमंत पाटील, बजरंग सुतार, अधिकराव पाटील, भास्कर वडगावे व दिलीप कांबळे अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील मास्टर माईंड हेमंत पाटील याचा मावस भाऊ सचिन पाटील हा फरारी आहे. तावडे हॉटेल येथील एका हॉटेलसमोर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दहा लाख रुपये रोख व एक स्विफ्ट मोटार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

याबाबत उपअधीक्षक सुरज गुरव यांनी दिलेली माहिती अशी की,  हेमंत पाटील व सचिन पाटील यांनी फिर्यादी संभाजी बापू निकम ( वय ४२, रा. निकम गल्ली, संभापूर, ता. हातकणंगले ) यांना विश्वासात घेतले. लोणावळा येथे नेऊन बनावट वरिष्ठ शासकीय वैद्यकीय अधिकारी गोयल असल्याचे भासवून वैद्यकीय विभागात विविध पदे भरायची आहेत. यासाठी प्रत्येकी चार लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यापैकी दोन लाख अगोदर व ऑर्डर मिळाल्यानंतर दोन लाख असे ठरविण्यात आले. याला बळी पडून फिर्यादी संभाजी निकम यांनी आपले नातेवाईक व मित्र सुशांत पाटील, सागर पाटील, तुषार पिष्टे, सुशांत दबडे, अमन जमादार, विशाल दबडे व संदीप दबडे यांच्याकडून चौदा लाख रुपये गोळा करून दिले. हा सर्व प्रकार मे २०१८ ते १५ ऑगस्ट या दरम्यान घडला आहे. यापैकी काही तरुणांना नोकरीची बनावट ऑर्डर देण्यात आली. तसेच काही कारणास्तव भरती थांबली आहे असे सांगून ऑर्डर थांबविण्यात आली. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक तरुणांची फसवणूक झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे अशा प्रकारे फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसात तक्रार दाखल करावी असे आवाहन सुरज गुरव यांनी पत्रकार परिषदेत केले.