Tue, Jan 22, 2019 12:02होमपेज › Kolhapur › ‘डीवायएसपी’सह ६ जणांना पोलिस कोठडी

‘डीवायएसपी’सह ६ जणांना पोलिस कोठडी

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 19 2018 1:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी

चाळीस हजार रुपयांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) ने अटक केलेल्या भारत बटालियनचे पोलिस उपअधीक्षक मनोहर गवळी, वरिष्ठ निरीक्षक मधुकर सकटसह सहा जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयितांच्या घरांची पहाटेपर्यंत झडती सुरू होती. बँक खात्यासह सीडीआरचीही पडताळणी सुरू होती. लाचप्रकरणी अधिकार्‍यांवर झालेल्या कारवाईचा एसीबीने रात्री उशिरा भारत बटालियनच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांना अहवाल सादर केला आहे. त्यामुळे लवकरच संबंधितांवर निलंबनाची कारवाई शक्य असल्याचे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

प्राथमिक चौकशीत बटालियनचे पोलिस अधीक्षक सपकाळ दोषी असल्याचा निष्कर्ष पुढे येत असला, तरी भक्‍कम पुरावे हाती आल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल, असे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले. या कारवाईनंतर एसीबीचे अप्पर पोलिस अधीक्षक आर. आर. गायकवाड मंगळवारी मध्यरात्री कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी कारवाईचा आढावा घेऊन संशयिताविरुद्ध भक्‍कम पुरावे संकलित करण्यासाठी पथकाला सूचना केल्या.

दैनंदिनी हजेरी व बंदोबस्तात सवलत देण्यासाठी पोलिसाकडून 40 हजार रुपयांची लाच घेताना भारत बटालियन (3) चे उपअधीक्षक गवळी, मधुकर सकट, आनंदा पाटील, राजकुमार जाधव, रमेश शिरगुप्पे, प्रवीण पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी कसबा बावडा येथील कार्यालयात रंगेहाथ पकडले होते.संशयितांना बुधवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायाधीश (4) आर.एस. निंबाळकर यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, सर्वांना पाच दिवसांची कोठडी देण्यात आली. सहायक सरकारी वकील विक्रम बन्‍ने व तपासाधिकारी गोडे यांनी युक्‍तिवाद केला. लाचप्रकरणी बटालियनमधील काही वरिष्ठाधिकार्‍यांचा सहभाग असल्याची माहिती चौकशीत निष्पन्‍न झाली आहे. चौकशीसाठी संशयितांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.

एसपीसह तिघांच्या संभाषणाची पडताळणी

तक्रारदार पोलिस, संशयित आनंदा पाटीलसह पोलिस अधीक्षक सपकाळ यांच्यात मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची सत्यता पडताळणीसाठी त्याचे सीडीआर मागविण्यात येत आहेत. शिवाय, लोकेशन, बँक खात्याच्या तपशिलाची वरिष्ठस्तरावर माहिती घेण्यात येत आहे. प्रत्यक्षात लाच घेताना झालेले संभाषण, आवाजाचीही सत्यता पडताळण्यात येत आहे, असेही गोडे यांनी सांगितले.

4 जिल्ह्यांतील एसीबीची टीम कोल्हापुरात दाखल

संशयित गवळीसह सहा जणांच्या घरांची मध्यरात्रीपर्यंत तपासणी सुरू होती. रात्री उशिरा त्याचा अहवाल उपलब्ध झाला आहे. बटालियनच्या वरिष्ठाधिकार्‍यासह सहा जणांवर एकाचवेळी कारवाई झाल्याने सांगली, सातारा व पुण्यातील एसीबीचे अधिकारी, कर्मचारी येथे दाखल झाले आहेत.

बटालियनच्या कार्यालयात सन्‍नाटा

भारत बटालियनच्या वरिष्ठाधिकार्‍यासह सहा जणांना एसीबीने लाचप्रकरणी अटक केल्याने कसबा बावडा येथील कार्यालयात दिवसभर सन्‍नाटा होता. बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी सकाळी कार्यालयात आले होते. अधिकार्‍यांच्या मनमानी कृत्यावर पोलिसांमध्ये दबक्या आवाजात चर्चा रंगली होती. नेहमीच गजबजलेल्या कार्यालयाचा परिसर ओसाड पडला होता.