कोल्हापूर : प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून घरासमोर लावलेल्या सहा दुचाकींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. सोमवारी सायंकाळी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौकातील पाडळकर वसाहतीत हा प्रकार घडला. तोंड बांधून आलेल्या 10 ते 15 जणांनी अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
पाडळकर वसाहतीत रितेश पाथरूट आईसोबत राहतो. आई गिरणीत दळपासाठी गेली होती. पिठाचा डबा घेऊन घरी येताना त्यांच्या दुचाकीला अज्ञाताचा धक्का लागला. याबाबत रितेशने जाब विचारल्याने अज्ञाताने रितेशला मारहाण केली. नातेवाईक व मित्रांनी सायंकाळी साडेसहा वाजता वाद मिटविला.
पुन्हा सायंकाळी साडेसात वाजता अज्ञातांनी पाडळकर कॉलनी येथील पाडळकर कुटुंबीयांच्या दारात येऊन 10 ते 15 युवकांनी दहशत माजवली.दगडफेक करून स्प्लेंडर (एम.एम. 09, बी.एस. 6473), अॅक्टिव्हा (एम.एच.09, डी.पी. 0405) आणि स्प्लेंडर (एम.एच.09, ए.एच.0405) या तीन दुचाकी फोडल्या तर तीन दुचाकी उलथवून टाकल्या. यात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञातांनी घरावर देखील चाल करून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण महिलांनी त्वरित दरवाजा बंद केल्याने घरावर दगडफेक केली.
अचानक घडलेल्या या प्रकाराने पाडळकर वसाहतीत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येताच अज्ञातांनी पळ काढला. सर्व हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधले होते. रात्री उशिरापर्यंत पाडळकर कॉलनी येथे पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम राजारामपुरी पोलिस स्टेशनमध्ये सुरू होते.