Mon, May 20, 2019 08:52होमपेज › Kolhapur › ४८ वर्षांच्या लढ्याला यश : शिक्षणमंत्री तावडेंचा निर्णय

राज्यातील ५९६ ग्रंथपाल पूर्णवेळ

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 10:46PMनूल : वार्ताहर

गेली 48 वर्षे प्रलंबित असलेला राज्यातील 596 अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे अनेक वर्षे अर्धवेतनावर काम करणार्‍या ग्रंथपालांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

राज्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये 2 हजार 409 पूर्णवेळ तर 2 हजार 322 अर्धवेळ ग्रंथपाल पदे मंजूर आहेत. मात्र, 1 हजार 813 पूर्णवेळ तर 1 हजार 615 अर्धवेळ ग्रंथपाल कार्यरत आहेत. पूर्णवेळ ग्रंथपालांच्या मंजूर पदांपैकी 596 पदे रिक्‍त आहेत. या रिक्‍त पदांवर अर्धवेळ ग्रंथपालांचे उन्‍नयन करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.

या निर्णयानुसार सर्व अर्धवेळ ग्रंथपालांची नियुक्‍ती दिनांक ग्राह्य धरून राज्यस्तरावरील सेवा ज्येष्ठता यादी शिक्षण संचालकांमार्फत करण्यात येईल. ही माहिती कर्मचार्‍याने स्वतः अपलोड करून मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करावयाची आहे. शिक्षण संचालक ही यादी शिक्षणाधिकार्‍यांना पाठवतील. रिक्‍त पदांच्या संख्येनुसार तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षणाधिकारी 596 अर्धवेळ ग्रंथपालांचे समायोजन करतील. 

चिपळूणकर समितीने 1980 मध्ये अर्धवेळ पद निर्माण केले. तेव्हापासून शेकडो ग्रंथपाल निवृत्त झाले. या पदास सेवा संरक्षण व अन्य लाभ मिळत नाहीत. तेव्हापासून पूर्णवेळची मागणी होत होती. संघटनेतर्फे शेखर कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, तपस्या मेहंदळे, विभा भगरे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण उपसचिव चारुशिला चौधरी यांनी हा निर्णय घेऊन अर्धवेळ ग्रंथपालांना न्याय मिळवून दिला.

गेली 48 वर्षे भिजत पडलेल्या या प्रश्‍नामुळे अर्धवेळ ग्रंथपालांना मोठा दिलासा मिळणार असून, उर्वरित 1 हजार 19 ग्रंथपालांनाही टप्प्याटप्प्याने पूर्णवेळ करण्याच्या हालचाली शासन स्तरावरून सुरू आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शेखर कुलकर्णी यांनी दिली.