Tue, Jul 23, 2019 10:31होमपेज › Kolhapur › वित्त आयोगाकडून जिल्ह्याला 54 कोटींचा निधी

वित्त आयोगाकडून जिल्ह्याला 54 कोटींचा निधी

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

चौदाव्या वित्त आयोगाकडून जिल्ह्याला यावर्षी 54 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यापैकी कोल्हापूर महापालिकेला 27 कोटी 4 लाख 24 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील 11 नगरपालिकांना 27 कोटी 25 लाख 
7 हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाने 2015-16 ते 2019-20 या पाच वर्षांसाठी वित्त आयोगाकडे मूलभूत अनुदान म्हणून 9 हजार 930 कोटी 28 लाख, तर सर्वसाधारण कार्यात्मक अनुदान म्हणून 2 हजार 482 कोटी 57 लाख असे एकूण 12 हजार 412 कोटी 85 लाख रुपये अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार वित्त आयोगाकडून दरवर्षी अनुदान देण्यात येते. 2018-19 या वर्षासाठी राज्याला मूलभूत अनुदानाचा पहिला टप्पा म्हणून एक हजार 102 कोटी 35 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

राज्य शासनाला प्राप्त झालेल्या पहिल्या टप्प्यातील अनुदान लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या निकषानुसार राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिका आणि नगरपरिषद, नगरपंचायती यांना वितरित करण्यात आले आहे. यानुसार कोल्हापूर महापालिकेला 2018-19 या वर्षांकरिता वित्त आयोगाचा मूलभूत सुविधांसाठी पहिला टप्पा म्हणून 27 कोटी 4 लाख 24 हजार 372 रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. इचलकरंजी नगरपालिकेला 14 कोटी 7 लाख 16 हजार 507 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीचा वापर प्रामुख्याने घनकचरा संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया, शौचालये, नागरी वनीकरण या कारणांसाठी करण्यात येणार आहे. शहरातील ही कामे पूर्ण झाली असतील, अशा कामांना निधीची आवश्यकता नसेल तर हा निधी अन्य देणी, विविध प्रकल्पांसाठी नागरी संस्थेचा हिस्सा (वर्गणी) म्हणूनही वापर करता येईल. मात्र, त्याकरिता आवश्यक त्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.