Thu, Apr 25, 2019 07:25होमपेज › Kolhapur › पैजेखातर ट्रॉलीतून 50 टन उसाची वाहतूक

पैजेखातर ट्रॉलीतून 50 टन उसाची वाहतूक

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:47AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

दोन ट्रॅक्टर चालकांत बोलता बोलता पैज लागली. डबल ट्रॉलीत 50 टन भरून दाखवायचे, मग काय दोघेही इर्ष्येला पेटले. पैज जिंकण्यासाठी मग सुरू झाला आटापिटा, भररस्त्यावर ट्रॉल्या उभ्या झाल्या, मोळ्या सरसर वर चढू लागल्या, सपासप कोयते पडू लागले, या नादात आपण भररस्त्यात गाड्या लावून वाहतूक रोखून धरली आहे, याचेही भान राहिले नाही. ट्रॉलीच्या क्षमतेच्या चारपट अधिक ऊस भरला गेलातरी त्याचीही चालकांना पर्वा राहिली नाही. सायंकाळी चार वाजता सुरू झालेली पैज जिंकण्याची स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

एकटाही मागे हटत नसल्याने इतर वाहनधारकांनी पर्यायी वाट शोधली खरी; पण इतरांचा जीव धोक्यात घालण्याएवढी मस्ती येतेच कुठून, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहिला नाही. 
ही घटना घडली आहे, कागल-मुरगूड रस्त्यावरील नदीकिनारा फाट्यावर. एकोंडी-नंदगावच्या रस्त्यावर मंगळवारी ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकांनी स्वत:च्या पैजेसाठी तब्बल चार तासांहून अधिक काळ सर्वांनाच वेठीस धरले. या प्रकारामुळे अन्य वाहनधारकांकडून संताप व्यक्त होत होता. प्रमुख राज्यमार्ग असल्याने या मार्गावर वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते.  पण हे ट्रॅक्टरचालक कुणाचीही पर्वा न करता ऊस भरत राहिले. हेलखावे खातच या गाड्या कारखान्याकडे रवाना झाल्या. 

मुळातच या रस्त्यावरील वाहतूक, एस.टी.सारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या फेर्‍या आणि औद्योगिक कामगारांची नेहमीची वर्दळ यामुळे अशाप्रकारे वाहतूक सुरू राहणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे. मुळातच हे 
ट्रॅक्टरचालक कोणतेही वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. गाड्यांना रिफ्लेक्टरही नाहीत. रहदारीच्या ठिकाणी जोरजोरात गाणी वाजवत गाड्या वाटेल तशा पळवण्यात हे चालक धन्यता मानतात.