Wed, Apr 24, 2019 01:47होमपेज › Kolhapur › 25 जणांना नोकरीच्या आमिषाने  50 लाखांचा गंडा; 5 जणांवर गुन्हा

25 जणांना नोकरीच्या आमिषाने  50 लाखांचा गंडा; 5 जणांवर गुन्हा

Published On: Aug 20 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 1:08AMशिरोळ : प्रतिनिधी

मुंबई मंत्रालयात सचिव पदावरील मुख्य अधिकारी आणि आरोग्य खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करून शिरोळ तालुक्यातील शिरोळ, उदगाव, मौजे आगर, अब्दुललाट आणि कोल्हापूर येथील अशा सुमारे 25 तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून पन्नास लाखांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबतची फिर्याद अनिल मारुती माने (रा. मौजे आगार, ता. शिरोळ) यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे. विजय चव्हाण (रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा), हेमंत हणमंत पाटील (रा. येडे मच्छींद्र), सचिन हंबीरराव पाटील (रा. वाटेगाव), अधिकराव पाटील, बजरंग सुतार (दोघे रा. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, जि. सांगली) अशी संशयितांची नावे असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सर्व जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संशयित विजय चव्हाण याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. या माध्यमातून अनिल माने यांची ओळख झाली. आम्ही तरुणांना शासकीय आरोग्य सेवेत क्लार्क व शिपाई या पदावर नोकरी लावतो, असे चव्हाणने सांगितले. माने आणि साक्षीदार अरुण किसन चव्हाण यांना लोणावळा येथे बोलावून घेतले. येथे सचिन पाटील लाल दिव्याच्या गाडीतून आला. मी मंत्रालयात सचिव  आहे.  इतर चार जण आरोग्य खात्यात अधिकारी आहेत, असे भासवून तुमच्या लोकांना नोकरी लावतो, असे सांगून माने, त्यांचे नातलग आणि साक्षीदार यांचा विश्‍वास संपादन केला. त्यांच्याकडून वेळोवेळी राहत्या घरी 49 लाख 30 हजार रुपये घेऊन फसवणूक केली.

शिरोळ तालुक्यातील दीपक माने, गौरव पाटील, राहुल नारीगकर (तिघे रा. मौजे आगर), गुरुनाथ महाबळे, संदीप डोंगरे, प्रदीप डोंगरे, श्रीनाथ पाटील , संदीप केणे, अभिजित पाटील, अनिकेत धोंड, संदेश पाटील, अक्षय चौगुले (सर्व रा. उदगाव), हरिश रमाने, मंगेश घाटगे (दोघे रा. कोल्हापूर), प्रियांका चव्हाण, सचिन नलवडे, प्रवीण काळदगे, अक्षय भाट, हर्षद भाट, वेदराज माने, बाळकृष्ण माळी, रोहन पिसाळ (रा. शिरोळ), अक्षय देशमुख, विशाल देशमुख (दोघे रा. अब्दुललाट) यांची फसवणूक झाली आहे.