होमपेज › Kolhapur › महिन्यात 48 हजार लिटर रॉकेलची बचत

महिन्यात 48 हजार लिटर रॉकेलची बचत

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 11:35PMकोल्हापूर : अनिल देशमुख

रेशनवरील रॉकेल वितरणासाठीही ‘बायोमेट्रिक’ पद्धतीचा ऑगस्ट महिन्यापासून वापर केला जात आहे. ‘पॉस’ मशिन द्वारे वितरण सुरू केल्याने जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल 48 हजार लिटर रॉकेलची बचत झाली आहे. कोल्हापूरनंतर इचलकरंजी शहरही या महिन्यापासून केरोसिनमुक्‍त झाल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

‘बायोमेट्रिक’ पद्धतीने धान्य वितरण करण्यात येते, त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात धान्याची बचत होत आहे. जिल्ह्यात सुमारे 26 हजार कार्डधारक धान्यच नेत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले. या कार्डधारकांचे धान्य अन्य पात्र कार्डधारकांना दिले जाणार आहे, त्यानुसार प्राधान्य कुटुंबांच्या यादीत नव्याने कार्डधारकांचा समावेश करण्याचे काम सुरू आहे.

धान्य वितरणासाठी ‘बायोमेट्रिक’ पद्धत कमालीची यशस्वी झाल्यानंतर राज्य शासनाने रॉकेलही त्याच पद्धतीने वितरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू केली. जिल्ह्यात ‘पॉस’ मशीनद्वारे रॉकेल वितरण सुरू झाल्याने महिन्याभरात सुमारे 48 हजार लिटर रॉकेलची बचत होत असल्याचे समोर आले. बचतीचा आकडा आणखी एक-दोन महिन्यात वाढण्याची शक्यता असल्याचे पुरवठा विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

आधारकार्ड सलग्‍न नसेल तर संबंधित कार्डधारकाला हमीपत्र दिल्याखेरीज रॉकेल दिले जात नाही. यामुळे भविष्यात आणखी रॉकेलची बचत होणार आहे. राधानगरी तालुक्यात दरमहा सात टँकर (84 हजार लिटर) रॉकेल लागते. मात्र, या निर्णयामुळे त्यानी तीन टँकर (36 हजार लिटर) रॉकेल कमी केले आहे. राधानगरी तालुक्याला आता केवळ 48 हजार लिटर रॉकेलचीच गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

इचलकरंजी शहरात यापूर्वी सहा टँकरद्वारे 72 हजार लिटर रॉकेलचे वितरण दरमहा केले जात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून केवळ एकच टँकर (12 हजार लिटर) रॉकेलचे वितरण करण्यात येत होते. या महिन्यापासून तेही बंद करण्यात आले आहे. यामुळे कोल्हापूरनंतर इचलकरंजी शहरही रॉकेलमुक्‍त झाल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.