Wed, Dec 19, 2018 22:04होमपेज › Kolhapur › एका दिवसात आढळले डेंग्यूचे 47 रुग्ण, बालिकेचा मृत्यू

एका दिवसात आढळले डेंग्यूचे 47 रुग्ण, बालिकेचा मृत्यू

Published On: Jul 10 2018 1:22AM | Last Updated: Jul 10 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

डेंग्यूने शहरात पाय पसरले असून, एका दिवसात 47 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूने कनाननगरातील मेघा प्रशांत कोळी (वय 9) या बालिकेचा रविवारी बळी घेतला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात नऊ दिवसांत तब्बल 230 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहर धास्तावले आहे.गेल्या तीन महिन्यांपासून शहरवासीयांची डेंग्यूने पाठच घेतली आहे. सोमवारी केलेल्या सर्वेक्षणात 47 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. जानेवारी महिन्यापासून शहरात डेंग्यूने उचल खाल्ली आहे. आतापर्यंत एकूण 922 जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्‍न झाले आहे. महापालिकेने आतापर्यंत एक लाख 29 हजार 75 कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. यात 3300 घरांमध्ये डेंग्यूस कारणीभूत असणार्‍या आळ्या सापडल्या.

गेल्या महिन्याभरापासून महापालिकेेेच्या आरोग्य विभागाने घराघरात जाऊन डेंग्यूचा सर्व्हे सुरू केला आहे. जनजागृती म्हणून माहिती पत्रके वाटून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 230 डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 128 रुग्णांनी महापलिका व सीपीआरमध्ये उपचार घेतला, तर 102 रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली. शहरात डेंग्यूने थैमान घातले असून, जून महिन्यात तब्बल 508 रुग्ण आढळले आहेत. तर 1 ते 9 जुलैअखेर तब्बल 230 डेंग्यूूची लागण झालेले रुग्ण आढळूून आले आहेत.त्यामध्ये रविवारी कनाननगरातील मेघा कोळी या बालिकेचा डेंग्यूने उपचार सुरू असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. मेघा ही विमला गोयंका विद्यालयाची विद्यार्थी असून तिच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.