Thu, Jul 18, 2019 06:24होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात तब्बल 45 हजार ग्राहकांचा वीज वापर शून्य युनिट

जिल्ह्यात तब्बल 45 हजार ग्राहकांचा वीज वापर शून्य युनिट

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 25 2018 9:33PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महावितरण कंपनीने विजेचा आवक-जावक लेखाजोखा सुरू केला असून, या मोहिमेत तब्बल 45 हजार ग्राहकांचा वीज वापर शून्य युनिट असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात विना वीजवापर ग्राहक एवढ्या मोठ्या संख्येने आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. हा तांत्रिक दोष आहे की  अन्य काही कारणांनी वीज वापराची नोंदच होत नाही याचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.

महावितरण कंपनीने ग्राहकांचे अचूक रीडिंग घेऊन योग्य बिल द्या, असा आदेश दिला. हा आदेश  दिल्यानंतर सरसकट ग्राहकांना युनिट वाढीचा फटका बसणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच कंपनीच्या मुख्यालयातून याची दखल घेण्यात आली. सरसकट ग्राहकांना त्रास न होता ज्यांचा वापर शून्य आहे. ज्यांना सरासरी वीज बिल पाठविण्यात येते. अशा ग्राहकांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. कोणताही ग्राहक असो त्याचा कमीत कमी युनिट तरी वीज वापर गृहीत धरला जातो. मात्र, यंत्रणेत असणार्‍या काही झारीतील शुक्राचार्याच्या आशीर्वादाने अनेक ग्राहकांच्या वीज वापराची नोंदच नसल्याचे या आकडेवारीने सिद्ध झाले आहे. त्यामुळेच 45 हजार 476 ग्राहकांचा वीज वापर केवळ शून्य असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

कृषिपंप ग्राहक वगळता जिल्ह्यात घरगुती, व्यापारी औद्योगिक असे एकूण नऊ लाख 28 हजार 251 ग्राहक आहेत. त्यापैकी 94.17 टक्के ग्राहकांना अचूक रीडिंग आणि योग्य बिलिंग होते. तर 5.83टक्के ग्राहकांच्या वीज वापर आणि बिलात त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. नादुरुस्त मीटर, मीटर न सापडणे, घर बंद असणे, आदी ग्राहकांचा समावेश आहे. 45 हजार 476 ग्राहकांचे बिल शून्य युनिट वापराचे येते. तर 795 ग्राहकांचे मीटर नादुरुस्त आहेत. 1956 ग्राहकांना सरासरीने व शून्य युनिटने बील दिले जाते. ही सर्व परिस्थिती कंपनी हितासाठी धोकादायक आहे.  

या परिस्थितीस कोण जबाबदार, संबंधित उपविभागीय कार्यालय, उपविभागीय कार्यालय प्रमुख, शाखा कार्यालय, शाखा कार्यालयाचे प्रमुख, लाईनमन, लेखा शाखेचे कर्मचारी अशा कोणत्याच टप्प्यावर या परिस्थितीविषयी का चर्चा होत नाही. यापैकी कोणाच्या ही गोष्ट का लक्षात येत नाही, लक्षात येऊनही ही मंडळी कानाडोळा करीत नाही ना अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. या सर्व मंडळींचा वैयक्‍तिक पातळीवर दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्याची गरज आहे.