Fri, Jul 03, 2020 02:53होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात ४१९ कोरोनामुक्त

कोल्हापूर जिल्ह्यात ४१९ कोरोनामुक्त

Last Updated: Jun 06 2020 1:09AM

प्रादिनिधिक फोटोकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण 62 टक्क्यांवर गेले आहे. शुक्रवारी आणखी 28 जणांना उपचारानंतर रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यात आजअखेर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 419 वर गेली. आज आणखी सहा नवे रुग्ण आढळले. यापैकी एकाचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या सात, तर एकूण रुग्णसंख्या 659 वर गेली. मेंढोली (ता. आजरा) येथील 80 वर्षीय वृद्ध चार दिवसांपूर्वी मुंबईहून गावी आले होते. घरातच त्यांना क्वारंटाईन करून ठेवले होते. त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यांना श्वसनाचा असलेला त्रास अधिक वाढला. यामुळे त्यांना उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, दुपारीच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील पाचजणांना तातडीने कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले असून, त्यांचेही स्वॅब घेण्यात आले आहेत. हे वृद्ध गावचे माजी पोलिसपाटील असून, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वास्तव्यास होते. त्यांच्या मृत्यूने आजरा तालुक्यात कोरोनाच्या बळीची नोंद झाली. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या सातवर गेली.पान 5 वर 
दिवसभरात 131 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 125 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांपैकी चारजण आजरा तालुक्यातील आहेत. यापैकी मेंढोली येथील मृताचा अहवाल आहे. यासह झुलपेवाडी येथील 51 वर्षीय तसेच करपेवाडी येथील 56 वर्षीय व्यक्तीचा, लाकूडवाडी येथील 70 वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित दोन अहवाल गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. हेब्बाळ-जरड्याळ येथील आणखी एका 31 वर्षीय महिलेला, तर शेंद्री येथेही एका 65 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यात आज आणखी 28 जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याने कोरोनातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या 419 वर गेली आहे. बरे होण्याचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात सीपीआरसह विविध कोरोना रुग्णालयांत 233 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.