Sat, Nov 17, 2018 04:40होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील ४० लघू प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

जिल्ह्यातील ४० लघू प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 12:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 54 पैकी तब्बल 40 लघू पाटबंधारे प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. ऑगस्ट महिन्यातच इतक्या मोठ्या संख्येने हे तलाव भरण्याची गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. दमदार पावसाने गेल्या दहा वर्षांतील पाणी साठवण क्षमतेची ही सर्वोत्तम स्थिती असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू अशा एकूण 67 प्रकल्पांत आजअखेर 93.44 टी.एम.सी. पाणी साठा झाला आहे. जिल्ह्यात चार मोठे, नऊ मध्यम तर 54 लघू असे एकूण 67 प्रकल्प आहेत. या प्रकल्पाद्वारे दरवर्षी 87 ते 88 टी.एम.सी.पाणीसाठा करण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी झालेल्या पावसाने मात्र, जिल्ह्यात नियोजनापेक्षा अधिकचा पाणीसाठा ऑगस्ट महिन्यातच झाला आहे. 

जिल्ह्यात 54 लघू पाटबंधारे प्रकल्प (पाझर तलाव) आहेत. यामुळे या प्रकल्पाच्या परिसरात सिंचनाची सोय झाली आहे. दरवर्षी हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. गेल्या 11 वर्षांत 2008, 2010 व 2011 व 2014 या चार वर्षांत सर्वाधिक 41 प्रकल्प  ऑक्टोबरअखेर भरले होते. त्या तुलनेत यावर्षी 18 ऑगस्टपर्यंत तब्बल 40 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अद्याप पावसाचा एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे, त्यासह परतीचा पाऊस आहे. यावर्षी सर्वाधिक लघू प्रकल्प भरण्याचीही शक्यता आहे.