Wed, May 22, 2019 14:59होमपेज › Kolhapur › आवाज कुणाचा? तरुणाईचा

आवाज कुणाचा? तरुणाईचा

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 12:40AMकोल्हापूर : अनिल देशमुख

लोकसभा आणि विधानसभा एकत्र घ्यायच्या का, स्वतंत्र घ्यायच्या? समविचारी पक्षांशी युती करायची की नाही? उमेदवारी कोणाला द्यायची? पक्षाचा अजेंडा काय ठेवायचा? अशा अनेक चर्चा राजकीय पक्षात सुरू आहेत. या चर्चेत मतदारांना किती स्थान दिले जाते हे माहीत नाही. मात्र, यापुढे मतदारांना विशेषत: तरुणांवर राजकीय पक्षांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. जिल्ह्याचे अनेकांचे राजकीय भवितव्य तरुणांवर ठरणार आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी तब्बल 40 टक्के मतदार हे वयाच्या 40 पेक्षा कमी वयोगटातील आहेत.

जिल्ह्यात मतदार नोंदणी पुनर्रीक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. जानेवारी 2019 मध्ये प्रसिद्ध होणारी मतदार यादी लोकसभा आणि त्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. या मतदार यादीत नवमतदारांची संख्या वाढावी याकरिता निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न सुरू केले आहे. याकरिता विद्यापीठांची मदत घेतली जात आहे. पदवी प्रवेश अर्जासमवेतच मतदार नोंदणी अर्ज भरून घेतले जात आहेत. शाळा-महाविद्यालयांत निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी याकरिता निवडणूक क्‍लब सुरू करण्यात आले आहेत. शाळेतील 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना निवडणुकीची माहिती व्हावी याकरिता उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर 2017 ते 10 जानेवारी 2018 या कालावधीत 22 हजार 896 नवीन मतदारांची वाढ झाली आहे. यापैकी 18 ते 29 वयोगटातील 20 हजार मतदारांचा समावेश आहे. हे प्रमाण पाहता, जानेवारी 2019 पर्यंत 18 ते 20 या वयोगटातील नवमतदारांच्या संख्येत 30 ते 40 हजारांपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्याच्या लोकसभा मतदार संघात सरासरी 15 ते 20 हजार तर विधानसभेच्या प्रत्येक मतदार संघात सरासरी 3 ते 4 हजार आणखी तरुण मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराला या नव मतदारांवर लक्ष केंद्रित करावे लागणार 
आहे.

40 पर्यंतचे 40 टक्के मतदार

40 वर्षांपेक्षा कमी वय असलेले 40 टक्के मतदार आहेत. जिल्ह्याच्या जानेवारी 2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार 39 वर्षांपर्यंतचे 12 लाख 26 हजार 331 मतदारांची नोंद आहे. 40 ते 60 या वयोगटातील मतदार हे एकूण मतदारांच्या 38 टक्के आहेत. त्यांची संख्या 11 लाख 37 हजार 639 इतकी नोंद आहे.

रंगीत फोटोसाठी उद्यापर्यंत मुदत

मतदार यादी रंगीत करण्यात येणार आहे. याकरिता मतदारांच्या रंगीत छायाचित्रांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) मतदार यादीत ब्लॅक-व्हाईट (जुने फोटो) छायाचित्र असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन रंगीत छायाचित्र जमा करून घेत आहेत. याबाबत मतदारांनी बीएलओना सहकार्य करावे,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.