Thu, Jul 18, 2019 12:46होमपेज › Kolhapur › नोकरीच्या आमिषाने 4.92 लाखांचा गंडा

नोकरीच्या आमिषाने 4.92 लाखांचा गंडा

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 11:32PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

नोकरीचे आमिष दाखवून जांभळी (ता.शिरोळ) येथील इकबाल मौल्ला मुजावर (वय 30) यांना कॅनडा येथील व्हिसा मिळविण्यासाठी व नोकरीकरिता वेळोवेळी रक्‍कम बँक खात्यावर भरण्यास सांगून 4 लाख 92 हजार उकळून फसवणूक केल्याप्रकरणी कुर्ला-मुंबई येथील दोघांना शिरोळ पोलिसांनी बुधवारी अटक केली. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. 

दोघांना जयसिंगपूर येथे प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुजावर यांनी शिरोळ पोलिसांत फिर्याद दिली होती.नरेंद्र हरिश्‍चंद्र नारायणे व श्रीमती धनश्री कैलास ससाणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, नारायणे याने नाव बदलून भीमा गंगाराम मोरे, तर ससाणे या महिलेने सीमा भीमा मोरे असे बनावट नाव धारण केले होते.
या बनावट नावे पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, बँक खाते, ई-मेल खाते तयार करून लोकांना नोकरी लावतो म्हणून खोटी कागदपत्रे तयार करून पैशांची मागणी करून बँक खात्यावर रक्‍कम जमा झाल्यानंतर संपर्क तोडत होते. या आरोपींनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह राज्यात गुन्हे केल्याची शक्यता आहे.

जांभळी येथील मुजावर यांनी नोकरीसाठी 20 नोव्हेंबर 2017 सीमा मोरे, गंगाराम मोरे आणि डेव्हिड मार्क (सीनिअर एचआर मॅनेजर) यांच्या नावे असलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठविला होता. सीमा मोरे यांनी मुजावर यांना फोन करून कॅनडाचा व्हिसा मिळविण्यासाठी 50 हजार व नोकरीसाठी येणारा खर्च सांगून भीमा मोरे यांच्या इंडियन बँक मुंबईच्या खात्यावर वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. 
त्यानुसार मुजावर यांनी 4 लाख 92 हजार रुपये मोरे यांच्या खात्यावर भरले. मात्र, दोघांनी पुन्हा फिर्यादीकडून 3 लाख 20 हजारांची मागणी केली. त्यावेळी मुजावर यांनी पासपोर्ट आणि नोकरीची विचारपूस केल्यानंतर दोघांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कुर्ला नेहरूनगर पोलिस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यावरून दोघांचा तपास करून शिरोळ पोलिसांनी दोघांना अटक केली.