Mon, Nov 19, 2018 23:06होमपेज › Kolhapur › गतवर्षी जिल्ह्यातील 396 शेतकर्‍यांचे पावसाने नुकसान

गतवर्षी जिल्ह्यातील 396 शेतकर्‍यांचे पावसाने नुकसान

Published On: Jul 11 2018 1:48AM | Last Updated: Jul 11 2018 1:37AMकोल्हापूर : अनिल देशमुख

जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या पावसाच्या नुकसानीसाठी जिल्ह्यातील केवळ 396 शेतकर्‍यांना पात्र ठरविले आहे. त्यांच्या भरपाईसाठी राज्य शासनाने 20 लाख 69 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भरपाईचा हा निधी थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत नियमित तसेच अनेकवेळा वळीव, अवेळी पाऊस झाला. या पावसाने राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामेही केले होते. राज्यात 2 लाख 79 हजार 522 शेतकर्‍यांचे 1 लाख 26 हजार 948 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. याकरिता राज्य शासनाने 110 कोटी नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे विभागातील 7 हजार 10 शेतकर्‍यांना पात्र ठरवले आहेत. पुण्याचे 3 हजार 169 तर सांगलीचे 2 हजार 981 शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेल्या शेतकर्‍यांना त्यांच्या मदतीची रक्‍कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. कोणत्याही स्वरूपात रोख रक्कम अथवा निविष्ठा स्वरूपात देऊ नये, तसेच जमा केेलेली रक्‍कम बँकेने कोणत्याही प्रकारच्या थकीत वसुलीसाठी वापरू नये, असेही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. जी भरपाई दिली जाणार आहे, तिची रक्‍कम वाटप केल्यानंतर  लाभार्थ्यांची यादी, त्यांना देण्यात आलेली रक्‍कम हा सर्व तपशील जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.