Tue, Apr 23, 2019 14:23होमपेज › Kolhapur › ‘एफआरपी’चे ३८५ कोटी जमा

‘एफआरपी’चे ३८५ कोटी जमा

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 12:07AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

साखरेच्या भावात झालेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर कारखान्यांकडून शेतकर्‍यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची रक्‍कम देण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील पंधरवड्यात शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर सुमारे आणखी 385 कोटी रुपये कारखान्यांनी जमा केले आहेत. एफआरपीची 30 जूनअखेरच्या ताज्या अहवालानुसार थकीत रक्‍कम 1158 कोटी 30 लाख रुपये असल्याची माहिती साखर आयुक्‍तालयातून गुरुवारी मिळाली. त्यामुळे एफआरपी देय रकमेचा आकडा आणखी 
खाली आला आहे.

राज्यातील 15 जूनअखेरच्या अहवालानुसार थकीत ‘एफआरपी’चा आकडा 1543 कोटी रुपये होता. त्यानंतर साखरेचे भाव वाढल्यामुळे कारखान्यांकडून एफआरपीची रक्‍कम देण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आलेले आहे. हंगाम 2017-18 मध्ये 188 कारखान्यांकडून ‘एफआरपी’ची एकूण देय रक्‍कम 21 हजार 281 कोटी 36 लाख रुपये इतकी होती.
त्यापैकी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 30 जूनअखेरच्या ताज्या अहवालानुसार सुमारे 20 हजार 699 कोटी 21 लाख रुपये जमा केले आहेत. काही कारखान्यांनी ‘एफआरपी’पेक्षा अधिक रक्‍कम शेतकर्‍यांना दिल्याचे सांगण्यात आले. 

एफआरपीची थकीत रक्‍कमेची विभागनिहाय स्थिती पाहता पुणे विभाग 489.30 कोटी, कोल्हापूर विभाग 218.17 कोटी, अहमदनगर विभाग 50.26 कोटी, औरंगाबाद विभाग 
167.38 कोटी, नांदेड विभाग 228.43 कोटी, नागपूर विभागात 4.77 कोटी रुपये मिळून एकूण 1158 कोटी 30 लाख रुपये शेतकर्‍यांना मिळणे बाकी आहेत. अमरावती विभागातील दोन्ही साखर कारखान्यांनी शंभर टक्के ‘एफआरपी’ची रक्‍कम दिलेली असल्याचे आयुक्‍तालयातून सांगण्यात आले. शेतकर्‍यांना 100 टक्के ‘एफआरपी’ची रक्‍कम 98 कारखान्यांनी दिली आहे. 71 ते 99 टक्के रक्‍कम 78 कारखान्यांनी, 51 ते 70 टक्के रक्‍कम 6 कारखाने, 26 ते 50 टक्के रक्‍कम 4 कारखाने आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी रक्‍कम देण्यामध्ये एक आणि ‘एफआरपी’ची रक्‍कम न दिलेल्या एका कारखान्याचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

केंद्र सरकारने साखरेचा प्रतिक्विंटलचा भाव 2900 रुपये निर्धारित केला. कारखान्यांना त्यापेक्षा कमी भावाने कारखान्यांना साखर विक्री करता येत नाही. या निर्णयानंतर खुल्या बाजारात साखरेचे भाव वाढले आहेत. त्यामुळे कारखान्यांकडून शेतकर्‍यांच्या एफआरपीची रक्‍कम देण्याचे प्रमाण वाढले आहे. थकीत एफआरपीप्रश्‍नी संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, रक्‍कम देण्यासाठी आयुक्‍तालयाकडून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे देय एफआरपीचा आकडा आणखी खाली येण्याची अपेक्षा आहे.
- संभाजी कडू पाटील, साखर आयुक्‍त, साखर आयुक्‍तालय.