Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Kolhapur › ३८ हजार कर्ज खात्यांचा गोंधळ

३८ हजार कर्ज खात्यांचा गोंधळ

Published On: Jan 17 2018 1:57AM | Last Updated: Jan 17 2018 12:23AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कर्जमाफीसाठी भरलेल्या अर्जात व बँकेने दिलेल्या माहितीत तफावत असल्याने 38 हजार 354 शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा गोंधळ निर्माण झाला आहे. बँकनिहाय आत्तापर्यंत 20 हजार खात्यांची माहिती संबंधित बँकांच्या शाखांना पाठवण्यात आली आहे. उर्वरित माहितीही बँकांना पाठवली जाणार आहे. यानंतर शासनाकडून संबंधित खाती तपासण्याबाबत सूचना देण्यात येणार असून, त्यानंतरच या खात्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होणार आहे. दरम्यान, यलो यादीतील 16 हजार खात्यांची पडताळणी करण्यात आली असून, ती माहिती अपलोड करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी जिल्ह्यातील 2 लाख  58 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज भरले असून, आत्तापर्यंत 90 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. यानंतर आता शासनाने 53 हजार 886 शेतकर्‍यांची यलो यादी व 38 हजार 354 शेतकर्‍यांची अर्धवट माहिती असलेली यादी पाठवली आहे. यलो यादीचे काम प्रगतीपथावर असले, तरी तांत्रिक दुरुस्ती असणारी यादी अडचणीची ठरत आहे. या यादीत अनेक त्रुटी आहेत. शासनाने केवळ 16 प्रकारच्या कर्ज खात्यांना मंजुरी दिली होती; मात्र अनेक शेतकर्‍यांनी याशिवाय असलेल्या कर्जाची माहिती सादर केली आहे. 

कर्जमाफीस अपात्र ठरत असणार्‍या शेतकर्‍यांनीही माहिती सादर केली आहे. अशा शेतकर्‍यांची माहितीही आता उपलब्ध झाली आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी, त्यांनी भरलेली माहिती, बँकेने सादर केलेली माहिती व शासनाचे निकष या सर्वांची सांगड घालून या अर्जांची तपासणी होणार आहे. याव्यतिरिक्‍तही कर्जमाफीचे अर्ज तपासण्यासाठी काही सूचना शासनाकडून येणार आहेत. या सूचनांची सहकार खात्याला प्रतीक्षा आहे. एकूणच 38 हजार 354 शेतकर्‍यांची यादी सध्या तरी संकटात सापडली आहे.