Fri, May 24, 2019 06:51होमपेज › Kolhapur › कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी 37 कोटींचा आराखडा मंजूर

कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी 37 कोटींचा आराखडा मंजूर

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 20 2018 11:50PMकोल्हापूर : प्रतिनिधी  

कोल्हापूर शहरात दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍याची शास्त्रोक्‍त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठीच्या 37 कोटी 17 लाखांच्या आराखड्याला (डीपीआर) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने 18 जूनला तांत्रिक मंजुरी दिली. पुढील आठवड्यात त्यासंदर्भातील जी.आर. निघेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महापालिकेला निधी मिळून शहरातील अत्यंत गंभीर बनलेल्या कचर्‍याचा प्रश्‍न कायमचा मिटण्याची शक्यता आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कोल्हापूर महापालिकेला हा निधी मिळणार आहे. 

कोल्हापूर शहरात दररोज सुमारे 180 टन कचरा जमा होता. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात यंत्रणा नाही. लाईन बाजार येथील झूम प्रकल्पावर कचरा नेऊन टाकला जात आहे. परिणामी, झूम प्रकल्पावर तब्बल पाच लाख टनांहून जास्त कचर्‍याचा डोंगर झाला आहे. त्याबरोबरच शहरात रोज जमा होणार्‍या कचर्‍यामुळे हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियांतर्गत कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी निधी मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले होते. 

त्यानुसार कन्सल्टिंग कंपनीकडून महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन विकास आराखडा तयार करून घेतला होता. आराखड्यानुसार कोल्हापूर शहराची भविष्यात होणारी लोकसंख्यावाढ विचारात घेऊन 223 टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यात भविष्यातील लोकसंख्यावाढीबरोबरच कचर्‍याच्या प्रमाणात होणारी वाढ व त्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी अनुषंगिक घनकचरा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.