Sat, Aug 17, 2019 17:10होमपेज › Kolhapur › ३,५०० शिक्षकांच्या बदल्या

३,५०० शिक्षकांच्या बदल्या

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 18 2018 1:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या अखेर गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने झाल्या. जिल्ह्यातील साधारणपणे साडेतीन हजारांवर शिक्षकांच्या बदल्या झाल्या. रात्री उशिरापर्यंत बदल्यांचे आदेश काढण्याचे काम सुरू होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बदल्या होण्याची जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिलीच घटना मानली जाते.

जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या आणि शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला होते. त्यापैकी शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार गेल्या वर्षापासून शासनाने काढून घेतले. सुगम-दुर्गमच्या कारणावरून शिक्षक संघटना बदल्यांच्या विरोधात न्यायालयात गेल्यामुळे गेल्या वर्षी शिक्षकांच्या बदल्याच होऊ शकल्या नाहीत. यावर्षी शासनाने शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाईन माहिती भरावी लागली.

बदलीसाठी शिक्षकांना वीस शाळा निवडण्याची मुभा दिली होती. ऑनलाईन अर्ज भरताना अनेक शिक्षकांना आपली माहिती व्यवस्थित भरता आली नसल्याची चर्चा होती. त्यामुळे बदल्यांकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. दोन दिवसांपूर्वी शासनाकडून बदली झालेल्या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेला प्राप्त होणार होती. त्यामुळे शिक्षक यादीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, शासनाने यादी न पाठवता थेट ऑनलाईन बदलीच्या ऑर्डरच पाठविल्या.

जिल्हा परिषदेत साधारणपणे नऊ हजार शिक्षक आहेत. त्यापैकी आज साडेतीन हजारांवर शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांचे आदेश सायंकाळनंतर ऑनलाईनवर पडू लागले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात धावपळ सुरू होती.

मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे बदलीच्या यादीवर हरकती येण्याची शक्यता गृहीत धरून शासनाने एकत्रित यादीच पाठविली नाही. शिक्षक संघटनांना यादीच्या विरोधात न्यायालयात जाण्याची संधी मिळू नये म्हणून शासनाने यादी तयार केली नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे बदलीच्या विरोधात जर न्यायालयात जायचे असेल, तर स्वत: शिक्षकालाच न्यायालयात जावे लागणार आहे.