Sat, Mar 23, 2019 18:07होमपेज › Kolhapur › गोवा बनावटीची 35 लाखांची दारू जप्‍त

गोवा बनावटीची 35 लाखांची दारू जप्‍त

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील अमरोळी येथील शेतातील गोठ्यात गोवा बनावटीच्या दारूचे सुमारे 35 लाख रुपये किमतीचे 545 बॉक्स जप्‍त करण्यात आले. रविवारी दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत मोटार आणि जीपसह 38 लाख 55 हजार रुपयांचा माल जप्‍त केला. गोठा मालक आणि दोन्ही वाहनांचे चालक कारवाई पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झाले.

गोवा बनावटीची दारू कोल्हापूर जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरोळी आणि कुमरी (ता. गडहिंग्लज) या गावांच्या दरम्यान असलेल्या रस्त्यापासून काही अंतरावर अमरोळी गावाच्या हद्दीत बाळू आप्पा नाईक यांचे शेत आणि गोठा असून, तेथेच ही कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पत्रकात दिली आहे. या कारवाईत मोटार कार (एमएच 06-डब्ल्यू-2044) आणि पिकअप जीप (एमएच07-पी-3374) ही दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या विभागीय उपायुक्‍त संगीता दरेकर आणि जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

याबाबत अधिकार्‍यांनी दिलेली माहिती अशी, अमरोळी-कुमरी रस्त्यावर रविवारी विशेष तपास मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी भरधाव वेगाने चाललेल्या वरील मोटार कारला थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने अधिकच गती वाढविली. गस्तीपथक जवळ येत असल्याचे पाहून त्याने कार रस्त्याकडेला थांबवून काजूच्या बागेतून पलायन केले. पथकातील कर्मचार्‍यांनी मोटारीची तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीचे विविध ब्रँडच्या दारूचे 25 बॉक्स सापडले. पुढे शेतात गोठ्याजवळ एक जीप थांबलेली सापडली. ती तपासली असता, त्यातही गोवा बनावटीच्या बाटल्यांचे 200 बॉक्स सापडले. ही दोन्ही वाहने संबंधित गोठ्याजवळच थांबली असल्याने पथकाचा संशय बळावला. त्यानंतर उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक पी. आर. पाटील, आर. एल. खोत व पथकाने परिसर पिंजून काढायला सुरुवात केली.
गोठा व खोलीच्या झडतीत 320 बॉक्स सापडले. या बॉक्समध्येही गोवा बनावटीच्या मध्यम आणि महागड्या ब्रँडच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या.