होमपेज › Kolhapur › करवीर, कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांचा समावेश

तीन मतदारसंघांतील ३२ हजार मतदारांची नावे रद्द

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:16PMकोल्हापूर : प्रतिनिधी

करवीर, कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघांतील 32 हजार 138 मतदारांची नावे मतदार यादीतून रद्द करण्यात आली आहेत. मयत, दुबार, स्थलांतरित अशा कारणास्तव ही नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. यांतर्गत 274, 275 व 276 या विधानसभा मतदार संघातील मयत, दुबार, स्थलांतरित या कारणास्तव आजअखेर एकूण 32,138 इतक्या मतदारांची योग्य ती प्रक्रिया पार पाडून वगळण्यात आली आहे. अद्यापही हे कामकाज सुरू आहे. या वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी निवडणूक शाखेमध्ये उपलब्ध आहे. मतदारांनी आपल्या नावाची खात्री करावी. मुदतीत कागदपत्रे प्राप्‍त न झाल्याने अथवा चुकीने एखाद्या मतदाराचे नाव वगळण्यात आले असल्यास त्यांनी पुन्हा नमुना नं.6 योग्य त्या पुराव्यासह निवडणूक शाखेमध्ये जमा करावा, त्यामुळे त्याचे नाव मतदार यादीमध्ये नव्याने दाखल करता येईल, असेही इथापे यांनी सांगितले.

मतदार याद्या शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत मतदारांचे कुटुंबाची माहिती आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी विहीत नमुन्यातील  फॉर्म 1-8 भरून घेणे, मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची छायाचित्रे कृष्णधवल आहेत त्यांची रंगीत छायाचित्रे जमा करणे  व ज्यांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत अशा मतदारांची छायाचित्रे जमा करण्याचे काम सुरू आहे. हे काम जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मुदतीत पूर्ण करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाही केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.