Tue, Jul 23, 2019 01:59होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : धरणांत 32 टक्के पाणीसाठा

कोल्हापूर : धरणांत 32 टक्के पाणीसाठा

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 19 2018 11:54PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाने दडी मारली असली तरी धरण क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व धरणांत सरासरी 32 टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा अधिक असल्याने यावर्षी धरणे लवकर भरण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात चार मोठे, आठ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पात यावर्षी पावसाळ्याच्या प्रारंभीच चांगला पाणीसाठा झाला आहे. मान्सूनपूर्वने अनेक भागात लावलली दमदार हजेरी आणि उन्हाळ्यात झालेली कमी मागणी यामुळे जून महिन्यात जिल्ह्यातील प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा आहे. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. गतवर्षी 1 जून ते 19 जून अखेर झालेल्या पावसाच्या तुलनेत यावर्षी याच कालावधीत अधिक पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यातील मोठ्या चार प्रकल्पात सरासरी 35 टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पात 32 टक्के तर जांबरे आणि कोदे या दोन लघू प्रकल्पात 28 टक्के पाणीसाठा झाला आहे. कुंभी धरणात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ एक टक्का कमी पाणीसाठा झाला आहे. कासरी आणि कुंभी परिसरात गतवर्षीच्या पावसाच्या तुलनेत यावर्षी काहींसा कमी पाऊस झाला आहे. हे वगळता जिल्ह्यात सध्या तरी समाधानकारक स्थिती आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जूनअखेर आणि जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांत दमदार पाऊस झाला तर जुलैअखेरपर्यंतच जिल्ह्यातील बहुतांशी धरणे पूर्ण क्षमतेने भरतील अशी स्थिती आहे. धरणे लवकर भरली आणि पावसाचा जोर कायम राहिला तर जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण होण्याचाही धोका आहे. सध्या तरी पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे यापुढे पावसाचा जोर कसा राहील, यावरच धरणांची आणि जिल्ह्यातील पूरस्थितीचे चित्र राहणार आहे.

धरणांची स्थिती
 

धरण नाव    पाणीसाठा     पाणीसाठा
    (आजअखेर)    (गतवर्षी आजअखेर)
राधानगरी    30 टक्के    17 टक्के
तुळशी    44 टक्के    41 टक्के
वारणा    41 टक्के    24 टक्के
दुधगंगा    26 टक्के    18 टक्के

धरण क्षेत्रातील पावसाची परिस्थिती

धरण नाव    1 ते 19     1 ते 19 जून 
    जून अखेर    2017 अखेर

राधानगरी    432 मि.मी.    165 मि.मी.
तुळशी    285 मि.मी.    38 मि.मी.
वारणा    139 मि.मी.    71 मि.मी.
दुधगंगा    281 मि.मी.    80 मि.मी.