होमपेज › Kolhapur › महावितरण अ‍ॅपचे 30 लाख वापरकर्ते 

महावितरण अ‍ॅपचे 30 लाख वापरकर्ते 

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 11:28PMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

पारदर्शक आणि गतिमान सेवा देण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या अ‍ॅपला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोन वर्षांत या अ‍ॅपचे राज्यात कायमस्वरुपी 30 लाख वापरकर्ते झाले आहेत. कर्मचार्‍यांसाठी असलेल्या चार अ‍ॅपद्वारे 84 हजार 378 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.या अ‍ॅपचा मोबाईलद्वारे वापर करून दरमहा तीन ते साडेतीन लाख ग्राहक वीज बिल भरणा करत असून, यातून महावितरणला 45 कोटींचा महसूल मिळत आहे. यावरून वीज ग्राहकांना महावितरणचे अ‍ॅप प्रभावी माध्यम बनत चालले आहे. 

इंटरनेटच्या युगात सर्वच सेवा गतिमान झाल्या आहेत, महावितरणने अ‍ॅपच्या माध्यमातून त्यात उडी घेतली आहे. या अ‍ॅपमध्ये महावितरणच्या सर्वच सेवा असल्याने राज्यातून 30 लाख ग्राहकांनी या अ‍ॅपचा वापर सुरू केला आहे. याशिवाय एसएमएसच्या माध्यमातून नवीन वीजजोडणी त्याबाबतची सद्यस्थिती, वीज बिलाचा भरणा, वीज मीटर बदलाची माहिती, वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती, वीज बिलाचे स्मरण, वीज बिलावरील पत्ता बदलणे अशा प्रकारच्या सर्वच सेवा सुरू आहेत. या सेवा देण्यासाठी महावितरणच्या राज्यातील 2 कोटी 50 हजार ग्राहकांपैकी 80 टक्के ग्राहकांचे मोबाईल नंबर जोडण्यात आले आहेत. त्याव्दारे ग्राहकांना संदेश पाठविण्यात येत आहेत. स्पॉट बिलिंग योजनेबाबत अनेक तक्रारींमुळे ग्राहकांना बिलावर मीटर रिडिंगचा फोटो देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. आता ग्राहकांचे मीटर रिंडिंग मोबाईल अ‍ॅपद्वारेही देण्यात येणार आहे. 

बील भरण्यासाठी मोबाईल व्हॅन

वीज बील भरणा करण्यासाठी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक व पतसंस्थाद्वारे राज्यात 12 हजार 300 केंद्रांवर वीज बील भरणा केंद्र सुरू केले आहे. याशिवाय, दुर्गम भागातील ग्राहकांना वीज बील भरण्यासाठी पैसे खर्च करून लांब जावे लागू नये यासाठी दोन महिन्यांपूर्वी महावितरणने मोबाईल व्हॅन सुरू केली आहे. ग्रामीण भागातील आठवडा बाजार व दुर्गम भागातील गावांमध्ये या व्हॅनची सेवा दिली जात आहे. या सेवेला ग्रामीण भागातील ग्राहकांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरदिवशी सुमारे 500 पर्यंत याप्रमाणे 30 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांनी त्याचा वापर केला आहे. 

‘पॉवर ऑन व्हील’ व्हॅनची सुविधा

सध्या पावसाळा सुरू आहे. जोरदार पाऊस व वादळी वार्‍यामुळे रोहित्र यंत्र कोसळणे, खांब कोसळणे, वाहिन्या तुटून पडणे, त्यामुळे वीज पुरवठा खंडित होणे अशा अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते. तसेच मोठ्या इमारती, मल्टिप्लेक्स, कमर्शिअल कॉम्प्लेक्स अशा ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणे हे महावितरणला परवडणारे नाही. अशा ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ‘पॉवर ऑन व्हील’ या व्हॅनची सुविधा करण्यात आली असून, त्यावर कुशल तांत्रिक कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत.