Wed, Sep 19, 2018 13:01होमपेज › Kolhapur › डोळ्यात चटणी टाकून साडेतीन लाख लंपास

डोळ्यात चटणी टाकून साडेतीन लाख लंपास

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:51AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

आरळगुंडी ते हलकर्णी रोडवर चौगुले यांच्या शेताजवळ अज्ञात तिघांनी अडवून, डोळ्यात चटणी टाकून काठीने मारहाण करीत, हातातील 3 लाख 61 हजार रुपये असणारी पैशाची बॅग पळवून नेल्याची घटना गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली. यामध्ये बबन जानू घाडेकर (रा. बुगटेआलूर) जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. घाडेकर हे पोल्ट्री सुपरवायझर असून, बुधवारी 3 लाख 61 हजार 200 रुपयांच्या कोंबड्यांची त्यांनी विक्री केली. ही रक्‍कम त्यांनी जॅकेटमध्ये ठेवली होती. रात्री उशिरा ते गावाकडे येण्यासाठी निघाले असता वाटेत झुडपालगत लपलेल्या तिघांनी अचानक आडवे येत डोळ्यात चटणी टाकून त्यांना अडवले. काठीने मारहाण करत त्यांच्याकडील 3 लाख 61 हजार 200 रुपये काढून घेऊन ते पळून गेले. तीनही चोरटे हे मराठी बोलणारे होते. पाळत ठेवून लूट केल्याने गडहिंग्लज तालुक्यात खळबळ उडाली आहे.

डोक्यामध्ये काठीने मारहाण केल्याने घाडेकर जखमी झाल. रात्री त्यांनी ही घटना नातेवाईकांना कळवल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांना दवाखान्यातून सोडण्यात आले. त्यानंतर त्यांनी गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दिली. ही लूट ही माहीतगार लोकांनी केल्याची शक्यता असून, पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.