Mon, Jul 13, 2020 03:02होमपेज › Kolhapur › गडहिंग्लजजवळ 28 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

गडहिंग्लजजवळ 28 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 2:03AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

गडहिंग्लज-आजरा रोडवर हिरलगे फाट्यानजीक अवैधरीत्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा चारचाकी टेम्पो पकडून यामधून वेगवेगळ्या ब्रँडचे 471 बॉक्स राज्य उत्पादन शुल्कने ताब्यात घेतले. या दारूची एकूण किंमत 28 लाख 27 हजार 680, तर जप्त मालाची वाहनासह 34 लाख 77 हजार 680 इतकी किंमत आहे.

दुपारच्या सुमारास हिरलगेनजीक टेम्पो (एम.एच. 07 पी 0495) गडहिंग्लजकडे येत असताना त्याला उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी थांबविले. टेम्पोची झडती घेतली असता 471 बॉक्स दारूसाठा सापडला. याप्रकरणी फिरोज अहमद शेख (वय 40, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला अटक करण्यात आली. 

मार्च महिन्यापासून राज्य उत्पादन शुल्कने 1 कोटी 61 लाख 31 हजार 399 रुपयांची दारू जप्त केली असून, गोवा कनेक्शन असणार्‍या दारूबाबत कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. ही कारवाई विभागीय उपायुक्त यशवंत पोवार, अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, शेवाळे, डी. एस. कोळी, एस. ए. कोळी, एस. आर. ठोंबरे यांच्या पथकाने केली. 

चार ठिकाणी नवीन तपासणी नाके
कोल्हापुरात अधीक्षक गणेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात होणारी दारूची अवैध 
वाहतूक पूर्णपणे रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने गगनबावडा, दाजीपूर, आंबोली, तिलारी या चार ठिकाणी नवीन वाहन तपासणी नाके सुरू केले आहेत. या चारही ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यांतर्गत पथकेही काम करत आहेत. यातून येत्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध दारू वाहतूक बंद करण्यात येईल.

आठ दिवसांत तीन कारवाया
या विभागाने आठवडाभरात तीन ठिकाणी छापे टाकून 23 लाख 50 हजार रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोन टेम्पो, एक ट्रक व दोन मोटारसायकली अशी पाच वाहने जप्त केली. तसेच मार्च, एप्रिल व 28 मेअखेर 1 कोटी 61 लाख 31 हजार 399 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे, असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.