होमपेज › Kolhapur › 28 शाळांना कारणे दाखवा नोटीस

28 शाळांना कारणे दाखवा नोटीस

Published On: Mar 15 2018 1:18AM | Last Updated: Mar 14 2018 10:21PM कोल्हापूर : प्रतिनिधी

शालेय कामकाजाच्या वेळी शाळेतील विद‍्यार्थ्यांना अन्य कोणत्याही कार्यक्रमाासठी कॅम्पसच्या बाहेर पालकांच्या व शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय पाठवू नये असे जि.प प्राथमिक, माध्यमिक व महापालिका शिक्षण अधिकारी यांनी मुख्याध्यापकांना लेखी कळवले होते.तरीदेखील शिक्षण वाचवा कृती समितीने मंगळवारी केलेल्या आंदोलनात शहरातील शाळांमधील विद‍्यार्थ्यांना मोठ्यासंख्येने सहभागी करुन घेतले होते. ही बाब गंभीर असल्याने मंगळवारी रात्रीच शिक्षणाधिकार्‍यांनी पोलिसामार्फत फौजदारी दंड प्रक्रिया अधिनियम कलम 149 अन्वये गुन्हे नोेंदवण्यास सुरुवात झाली.

माध्यमिक शिक्षण विभागात बुधवारी दिवसभर या आंदोलनात सहभागी शाळांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु होते. माहिती संकलीत झाल्यानंतर शहरातील 28शाळांना तातडीने कारणे दाखवा नोटीस लागू केली गेली आहे. ही नोटीस लागू करताना प्रत्यक्ष आंदोलनस्थळावरील विद‍्यार्थ्यांच्या सहभागाची छायाचित्रे, वर्तमानपत्रातील बातम्या यांचा संदर्भ म्हणून वापर करण्यात आला आहे. शिक्षणाधिकार्‍यांनी घेतली एन.डीची भेट 34 शाळा बंद करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयावर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाची भूमिका पटवून सांगण्यासाठी सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांच्या सुचनेनुसार बुधवारी सकाळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी.पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

या भेटीत मुलांचे सामाजिकरण आणि गुणवत्तेसाठीच हा निर्णय घेतला असून शिक्षक सांगतात यापेक्षा दुसरी बाजूही या प्रकरणाला असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शाळा बंद करण्याच्याबाबतीत एन.डी.पाटील यांनीही बंद होणार्‍या शाळा इतर संस्थांना चालवायला देणार का याबाबत विचारणा केली. यावर शिक्षणाधिकार्‍यांनी हा शासनस्तरावरचा प्रश्‍न असल्याचे स्पष्ट केले.

18 मार्चला लाँग मार्च तर 23ला महामोर्चा शाळा बंद करण्याच्या शासन धोरणाविरोधात शिक्षण वाचवा कृती समितीने आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 18 मार्चला महिला शिक्षीका शिक्षण उपसंचालक कार्यालयावर लाँग मार्च काढणार आहेत. 23 ला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा निघणार असून यात एक लाख शिक्षक सहभागी करण्याचे नियोजन सुरु आहे.