Thu, Jul 18, 2019 08:54होमपेज › Kolhapur › 27 हजार मतदारांची नावे रद्द

27 हजार मतदारांची नावे रद्द

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 06 2018 1:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी

लोकसभेसाठी जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या मतदारयादीतील 27 हजार 62 मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्वाधिक 18 हजार 179 मतदारांचा समावेश आहे. यासह करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले व इचलकरंजी या मतदारसंघांतील मतदारसंख्येत घट झाली आहे. तर चंदगड, राधानगरी, कागल व शिरोळमध्ये मतदारांत वाढ झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 4 जानेवारी 2019 रोजी मतदारयादी अंतिम केली जाणार आहे. याकरिता 1 सप्टेंबर रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध कण्यात आली. जिल्ह्याची यापूर्वी एक जानेवारी 2018 रोजी मतदारयादी प्रसिद्ध केली होती, त्यानुसार जिल्ह्यात 29 लाख 92 हजार 375 मतदार होते. एक सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीनुुसार जिल्ह्यात 29 लाख 65 हजार 313 मतदार आहेत.

दरम्यान, ज्या मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत त्यांना तसेच नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणार्‍यांना दि. 31 ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. याच कालावधीत मतदारयादीतील दुरुस्तीही मतदारांना करता येणार आहे. तसेच प्रारूप मतदारयादीवर दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी घेऊन त्या दि. 30 नोव्हेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. वगळण्यात आलेली नावे, मतदारयादी पाहण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत, संबंधितांनी आपल्या नावांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर दक्षिण, उत्तर व करवीर मतदारसंघातील बीएलओंची बैठक झाली. या बैठकीत मतदारयादी पुनर्रिक्षण कार्यक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या. यावेळी तहसीलदार सचिन गिरी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.