Thu, Nov 15, 2018 22:25होमपेज › Kolhapur › २६ जानेवारी, कोल्हापूर आणि जिलेबी (व्‍हिडिओ)

२६ जानेवारी, कोल्हापूर आणि जिलेबी (व्‍हिडिओ)

Published On: Jan 25 2018 7:24PM | Last Updated: Jan 25 2018 7:24PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापुरात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला घराघरांत जिलेबी खाण्याची परंपरा आहे. आतापर्यंत ही परंपरा कधी आणि कशी सुरू झाली हे कोणालाच ठामपणे सांगता येत नाही. पण, वर्षातील या दोन्ही दिवशी कोल्हापुरात जिलेबीच खाल्ली जाते. शहरात कोपऱ्या कोपऱ्यावर जिलेबीचे स्टॉल लावले जातात. स्टेरिओवर देशभक्तीची गाणी लावली जातात. एक वेगळेच वातावरण शहरात अनुभवायला मिळते. कदाचित हे इतर कोणत्याच शहरात दिसणार नाही. त्यामुळं पुढारी ऑनलाईनच्या टिमने या जिलेबीचा इतिहास जाणून घेतला. 

कोल्हापुरातील जिलेबीचा इतिहास हा तसा जुना आहे. कोल्हापुराचे कुस्ती शौकिन रामचंद्र बाबाजी माळकर यांच्याकडून कुस्तीगिरांचे तोंड गोड करण्यासाठी जिलेबीचे वाटप केले जायचे अन तेव्हापासून जिलेबी वाटण्याची प्रथा सुरू झाली जी आजतागायत चालू आहे. माळकरांची आता चौथी पिढी या व्यवसायात आहे. 

प्रजासत्ताक दिनीच्या पार्श्वभूमीवर सागर माळकर यांनी पुढारी ऑनलाईनशी संवाद साधला. ते म्हणाले, "मी स्वतः  पुण्यात आयटी क्षेत्रात काम करतो. पण, घरचा व्यवसाय असल्यामुळं घरच्यांना मदत करण्यासाठी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाला आठवडाभर रजा काढून येतो. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात  शाही कार्यक्रमात, सणादिवशी, आणि कुस्तीगीरांना जिलेबी वाटण्यासाठी माळकरांच्या दुकानातून जिलेबी खरेदी केल्याची नोंद आहे."

महानगरपालिकेची इमारत नव्हती, त्या आधीपासून माळकरांचा वाडा आणि दुकान या परिसरात आहे. या परिसरालाच आता माळकर तिकटी असे नाव आहे.