Wed, Mar 20, 2019 02:46होमपेज › Kolhapur › पाणीपुरवठा संस्थांना ठिबकसाठी २६०० कोटींचा निधी

पाणीपुरवठा संस्थांना ठिबकसाठी २६०० कोटींचा निधी

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 04 2018 10:41PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मागेल त्याला ठिबक संच देण्याच्या सरकारच्या धोरणात आता पाणीपुरवठा संस्थांचाही समावेश केला जाणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून या संस्थांतून ऑटोमायझेशन पद्धतीने ठिबक देण्यासाठी 2600 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. राज्यातील 3 लाख हेक्टरवर प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जाणार आहे, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील शेतकर्‍यांना सुखी व आनंदी करण्यासाठी ठिबकला प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगत ऑटोमायझेशनसह ठिबक अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मेरी वेदर मैदानावर आयोजित कोल्हापूर जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 7 मार्चपर्यंत चालणार्‍या या महोत्सवात शेती औजारे, बी-बियाणे, औषधे, खतांसह थेट शेतमाल विक्रीचे स्टॉल आहेत. खाद्य महोत्सवासह पाच दिवस पीक परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. 

यावेळी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जि.प. अध्यक्ष शौमिका महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जि.प. सीईओ डॉ. कुणाल खेमनार, विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराव मास्तोळी यांची उपस्थिती होती. 

मंत्री खोत यांनी शेतकर्‍यांसाठी सरकार राबवत असलेल्या योजनांचा आढावा घेऊन ठिबकवर गांभीर्याने काम सुरू असल्याचे सांगितले. मागेल त्याला शेततळे याप्रमाणे मागेल त्याला ठिबकचे धोरण असून 700 कोटी उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया वर्षभर सुरू ठेवण्यात आली आहे. वैयक्तिक शेतकर्‍यांबरोबरच आता शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या संस्थांनाही ठिबकच्या कार्यकक्षेत घेण्याचे सरकारचे धोरण आहे. नाबार्डने निधीसाठी पुढाकार घेतला असला, तरी साखर कारखाने व शेतकरी यांचा सहभाग घेऊन निधी उभारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकर्‍यांना सुखी करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सांगताना 2014 पेक्षा आताची शेतकर्‍यांची परिस्थिती खूपच सुधारली आहे. ठिबकबरोबरच आता शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत रस्ता जाण्यासाठी पाणंद सुधार योजना राबवली जात आहे. विकासासाठी सरकारकडे आता पैशाची कोणतीही कमतरता नाही. जीएसटी, मुद्रांक विक्रीसह अन्य स्रोतांतून मोठ्या प्रमाणावर निधी येत आहे. घर चालवावे तसे मुख्यमंत्री काटकसरीने राज्य चालवत आहेत. आगामी अर्थसंकल्पात त्याची झलक पाहायला मिळेल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. 

स्वागत व प्रास्ताविक विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराव मास्तोळी यांनी महोत्सव आयोजनामागची भूमिका विशद करून स्टॉलची माहिती दिली. कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार-फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. 

उत्कृष्ट शेतकर्‍यांचा गौरव

कृषिभूषण, शेतीनिष्ठ व पीक स्पर्धा विजेत्या शेतकर्‍यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात आनंदा मटकर, मच्छिंद्र कुंभार, आनंदा पाटील, धोंडिराम खतकर, आनंदा देसाई, कृष्णात जरग, संतोष शेळके, मधुकर तेलवेकर, प्रमोद चौगले, बाळगोंड पर्वते, साताप्पा पाटील, सूर्यकांत देसाई, लक्ष्मण पाटील, तात्यासो पोवार, शिवाजी तळेकर, रवींद्र पाटील, काशिनाथ मुजुमदार, बाळगोंडा पाटील, अर्जुन कुंभार, राजगोंड सुरकुसे, अमोल बोरगावे, किरण शिंदे, पूजा सावंत यांचा समावेश होता. 

कलात्मक व्यासपीठ 

कृषी महोत्सवात उभारलेले बांबूच्या नानाविध वस्तूंचा वापर करून मांडणी केलेले कलात्मक व्यासपीठ सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरले. बैठक व्यवस्थेपासून ते पाणी ठेवण्याच्या स्टँडपर्यंत सर्व काही बांबूपासून बनवलेल्या वस्तू होत्या. बांबूचे उत्पादन व साहित्य निर्मितीवर विशेष परिसंवादाचेही आयोजन करून बांबू शेतीचे महत्त्व महोत्सवातून कृषी विभागाने दाखवून दिले.