Tue, Mar 26, 2019 22:10होमपेज › Kolhapur › शिवराज्याभिषेक चित्ररथात इतिहासाशी छेडछाड (Video)

शिवराज्याभिषेक चित्ररथात इतिहासाशी छेडछाड (Video)

Published On: Jan 29 2018 5:52PM | Last Updated: Jan 29 2018 6:47PMअनिरुद्ध संकपाळ : पुढारी ऑनलाईन 

प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनात राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या चित्ररथाला इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. चित्ररथात इतिहासाशी छेडछाड झाल्याचे सावंत यांनी सांगितले. या चित्ररथाला प्रथम पारितोषिक देखील मिळाले आहे. सरकारी कार्यक्रमात अशी चूक होणे ही गंभीर बाब आहे, असेही सावंत म्हणाले. सोशल मीडियावर सध्या सावंत यांची ही चित्ररथाची भूमिका व्हायरल झाली असून, यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

एक जानेवारी २०१८ला कोरेगाव-भीमा येथे वादग्रस्त मजकूर लिहलेल्या फलकावरुन वाद पेटला होता. याचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले होते. त्यानंतर वातावरण आता थोडे निवळले आहे, असे वाटत असतानाच राज्य सरकारच्या शिवराज्याभिषेक चित्ररथात झालेल्या चुकांबाबत शिवप्रेमींतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

याबाबत पुढारी ऑनलाईनने इंद्रजित सावंत यांच्याशी संवाद साधला. प्रजासत्ताक दिनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथात मेघडंबरीत बसलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपातील कलाकार भगवान विष्णूची मूर्ती हातात घेऊन बसला आहे, यावर सावंत यांनी आक्षेप घेतला. 

‘राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात भगवान विष्णूची मूर्ती असल्याचे कोणतेही समकालीन पुरावे नाहीत. त्यामुळे संचलनात विष्णूची मूर्ती हातात घेतलेला मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या रुपातील कलाकार इतिहासाला धरून नाही. तसेच चित्ररथात राजमुद्रेची कॅलीग्राफी देखील विसंगत आहे. राज्य सरकारच्या वतीने सादर झालेल्या या चित्ररथात इतक्या गंभीर चुका होणे ही अक्षम्य बाब आहे,' असे सावंत म्‍हणाले.

शिवराज्याभिषेकासारख्या शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याच्या विषयाचे संशोधन न करता, अभ्यास न करता, त्याचे राजपथासारख्या मोठ्या व्यासपीठावरून सादरीकरण केल्यामुळे सोशल मीडियावर शिवप्रेमींच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.