Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Kolhapur › राज्यात  2500 कोटी रुपयांची एफ.आर.पी. थकीत

राज्यात  2500 कोटी रुपयांची एफ.आर.पी. थकीत

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 22 2018 1:11AMकुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार

साखरेच्या बाजारातील किमती ढासळलेल्या असताना, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात ऊस उत्पादकांची सुमारे 2500 कोटी रुपयांची ऊस बिले (एफ.आर.पी. नुसार होणारी) थकवली आहेत. महाराष्ट्रात 184 साखर कारखाने गळीत हंगाम घेत आहेत. यापैकी 136 साखर कारखान्यांना एफ.आर. पी. थकवली म्हणून राज्य सरकारने ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे. संकटांनी घेरलेले कारखाने यामुळे हबकले आहेत.

चालू 2017-18 च्या हंगामासाठी पहिल्या 9.5 टक्के उतार्‍याला प्रतिटन 2550 रुपये अधिक पुढील एक टक्‍का उतार्‍याला 268 रुपये प्रतिटन अशी एफ.आर.पी. आहे. ही एफ.आर.पी. उसाची तोड झाल्यापासून 14 दिवसांच्या आत ऊस उत्पादकाच्या खात्यावर जमा केलीच पाहिजे. यात कसूर करणार्‍या कारखान्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.महाराष्ट्रात 184 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला आहे. यापैकी बहुतेक कारखाने राजकीय नेत्यांचे आहेत. यापैकी तब्बल 136 साखर कारखान्यांनी त्यांना या हंगामात ऊसपुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांची  एफ.आर.पी. नुसार होणारी ऊस बिले थकवली आहेत . यापैकी 97 कारखाने सहकारी तर 83 कारखाने खासगी आहेत.

साखर आयुक्‍तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या सर्व कारखान्यांची एफ.आर.पी. नुसार 12 हजार 813 कोटी रुपयांची ऊस बिलाची रक्‍कम होते. त्यापैकी 10 हजार 775 कोटी रुपये ऊस उत्पादकांना दिले आहेत. सुमारे 2 हजार 038 रुपये थकीत आहेत.

एफ.आर.पी.चा. संबध बाजारभावाशी नाही!

साखर कारखानदारांच्या मते, साखरेच्या खुल्या बाजारातील किमती मोठ्या प्रमाणात ढासळल्या आहेत. साखरेला उठाव नाही. त्यामुळे कारखान्याकडे साखरेच्या साठ्याचे डोंगर आहेत. त्यामुळे ते ऊस उत्पादकांची ऊस बिले देऊ शकत नाहीत. पण साखर आयुक्‍तालयाच्या अधिकार्‍यांच्या मते, एफ.आर.पी. चा संबंध साखरेच्या बाजारभावाशी जोडता येणार नाही. त्यांच्या मते, साखरेच्या बाजारातील किमती केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवल्याने, कारखान्यांवर स्टॉक होल्डिंग लिमिट घातल्याने वधारत आहेत.

साखर विक्रीची चौकशी करा!

सध्या साखरेचे दर प्रतिक्‍विंटल 2850 रुपये ते 3000 रुपयांच्या दरम्यान आहेत. साखर कारखानदारांचे साखरेच्या बाजारावर नियंत्रण असून कारखानदार स्वतःच्या फायद्यासाठी याचा वापर करीत आहेत. जर ऊस उत्पादकांची वैधानिक देणी दिली नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना याविरुद्ध दाद मागणार आहे, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांतील कारखान्यांच्या साखर विक्रीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कारण किरकोळ बाजारातील किमतीत बदल नाही.

Tags : Kolhapur,Kolhapur News, 2500 crore, FRP, outstanding, in Maharashtra, sugar cane factory