होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात उद्रेक सुरुच; आज एका दमात २५ कोरोनाग्रस्तांची भर

कोल्हापुरात उद्रेक सुरुच; आज एका दमात २५ कोरोनाग्रस्तांची भर

Last Updated: May 28 2020 12:54PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात सकाळी आलेल्या अहवालांमध्ये नवे २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधितांचा आकडा ४२७ वर गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात गडहिंग्लज तालुक्यातील तब्बल ९ जणांचा समावेश आहे. यामध्ये मुंगूरवाडीतील ५, तर महागाव, बेळगुंदी, हसूरवाडी, कुमरी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

गेल्या दोन दिवसात तालुक्यात दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आज तब्बल ९ रुग्ण आढळल्याने तालुका हादरला आहे. तालुक्यातील आतापर्यंत ः तेरणी ४, कळविकट्टे १, काळामवाडी १, यमेहट्टी ३ (पैकी १ मयत), भडगाव १, गिजवणे १, चन्नेकुप्पी (१ मयत), हनिमनाळ १, सांबरे १, तावरेवाडी १, हडलगे १ असे रुग्ण होते. आता एकूण रुग्णसंख्या २५ वर गेली आहे.

जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा चौथा बळी गेला. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या यमेहट्टी (ता. गडहिंग्लज) येथील 52 वर्षीय व्यक्‍तीचा गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात काल दुपारी दीड वाजता मृत्यू झाला. सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी सांगितले.

गडहिंग्लज तालुक्यात सलग दोन दिवसांत कोरोनाने दोन मृत्यू झाल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा हादरली आहे. दरम्यान, आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आणखी 19 रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने चारशेचा आकडा ओलांडला. 

काल 19 जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यातील आणखी 19 जण बुधवारी कोरोनामुक्‍त झाले. सीपीआरसह विविध कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्यांचे फॉलोअप स्वॅब (उपचार कालावधी संपल्यानंतरची तपासणी) निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात अशा 19 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या आता 39 झाली आहे. आढळणार्‍या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होण्याची जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सध्या 10 टक्के इतकी आहे.