Tue, Mar 26, 2019 11:39होमपेज › Kolhapur › ३ महिन्यांत २३ हजार मतदार वाढले

३ महिन्यांत २३ हजार मतदार वाढले

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 24 2018 9:54PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात तीन महिन्यांत 22 हजार 921 मतदारांची वाढ झाली आहे. यापैकी 18 ते 19 या वयोगटातील मतदारांची संख्या 12 हजार 510 इतकी आहे. प्रभारी निवडणूक उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, गुरुवारी (दि.25) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावर्षी आयोगाचे ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य आहे. त्यानुसार मतदार दिवसांसाठी जिल्हा ऑयकॉन म्हणून हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड संस्थेच्या अध्यक्षा नसीमा हुरजुक यांची निवड करण्यात आली आहे. ‘स्वीप-3’ या कार्यक्रमासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून नृत्यांगना संयोगिता पाटील हिची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारी सकाळी 8.30 वाजता बिंदू चौकातून प्रभात फेरी काढण्यात येईल. प्रारंभी नेहरू युवा केंद्राच्या वतीने मतदार जागृती पथनाट्याचे सादरीकरण व निवडणूक प्रतिज्ञापत्रांचे वाचन होईल. यानंतर प्रभात फेरीला प्रारंभ होईल. शिवाजी चौक, महापालिका मार्गे फेरीची शाहू स्मारक भवन येथे सांगता होईल. मतदार दिनाचा मुख्य कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे होईल. त्यात नवमतदारांना तसेच अपंग मतदार यांना मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, डाटा ऑपरेटर यांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे.

जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी 3 आक्टोबर 2017  रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 10 जानेवारी 2018 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार या कालावधीत 22 हजार 921 मतदारांची वाढ झाली असून त्यात 11 हजार 777 महिला तर 11 हजार 141 पुरुष तर 3 इतर मतदारांचा समावेश आहे. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्याची मतदार संख्या 29 लाख 92 हजार 375 इतकी झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी निवडणूक तहसीलदार सुचित्रा आमले, नायब तहसीलदार शोभा कोळी, शिल्पा देसाई आदी उपस्थित होते.