Thu, Apr 25, 2019 23:25होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील रस्त्यांची 220 कोटींची कामे ठप्प

जिल्ह्यातील रस्त्यांची 220 कोटींची कामे ठप्प

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बरीच आंदोलने आणि निधी मागणीसाठी पाठपुराव्यानंतर जिल्ह्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्यांची कामे सुरू झाली होती; पण ही कामे करणारे कंत्राटी कर्मचारीच बेमुदत संपावर गेल्याने ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. यात पंतप्रधान सडकमधील 7 पूल आणि मुख्यमंत्री सडक योजनेतील 81 रस्ते अशा एकूण 220 कोटींच्या कामांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात पंतप्रधान सडक व मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत जिल्हा परिषद वगळता इतर मार्गावरील रस्त्यांची कामे केली जातात. साधारणपणे मे महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण करावी लागतात. त्यासाठीची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यापूर्वी मंजुरी झालेली कामेही सुरू आहेत. जिल्ह्यात आजच्या घडीला 81 रस्त्यांची 189 कोटी 16 लाखांची कामे प्रस्तावित आहेत. यात मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत 2017 साली मंजूर झालेले 65 कोटी 4 लाखांचे 115 किलोमीटर लांबीच्या 20 रस्त्यांचे काम सुरू आहे. 

2018 साली याच योजनेंतर्गत 80 कोटी 82 लाख रुपयांचे 122 किलोमीटर लांबीच्या 23 रस्त्यांच्या कामांचे टार्गेट समोर ठेवण्यात आले आहे. 78 किलोमीटरचे 43 कोटी 30 लाख किमतीचे 38 रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ही सर्व कामे 189 कोटींची आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत 30 कोटी 91 लाख किमतीच्या 7 पुलांचे बांधकाम सध्या सुरू आहे. आता मार्च एंडिंग तोंडावर असल्याने कामाचा पसारा वाढला आहे. पावसाळा सुरू होण्याआधी कोणत्याही परिस्थितीत ही कामे पूर्ण करण्याचे टार्गेट आहे; पण आता हे कर्मचारीच संपावर गेल्याने या सर्व कामांवर मोठा परिणाम होणार आहे. मुळातच या कार्यालयातील कर्मचार्‍यांवर कामांचा अतिरिक्त ताण आहे. कनिष्ठ अभियंत्याची 13 पदे मंजूर असताना केवळ 4 कार्यरत आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहायकचीही 13 पदे मंजूर असताना 8 कर्मचार्‍यांवर काम ओढून नेले जात आहे. अतिरिक्त काम करूनही गेल्या सहा वर्षांपासून पगारवाढ होत नाही. सरकारी नोकराप्रमाणे काम करूनही कोणतेही इतर भत्त्याचे लाभ मिळत नसल्याने या कर्मचार्‍यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. 

शनिवारी पालकमंत्र्यांसमवेत बैठक
आतापर्यंत आश्‍वासनाशिवाय पदरात काहीच पडलेले नसल्यामुळे बेमुदत कामबंदचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी शनिवारी भेटीची वेळ दिली असून त्यांच्यासमोर कंत्राटी कर्मचार्‍यांच्या व्यथा मांडल्या जाणार आहेत, असे कनिष्ठ अभियंता व कर्मचारी संघटनेचे सदस्य अमोल सुतार यांनी सांगितले.