Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Kolhapur › नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

Published On: Aug 15 2018 1:23AM | Last Updated: Aug 15 2018 12:37AMकागल : प्रतिनिधी 

राज्य उत्पादन शुल्क व भारती विद्यापीठामध्ये नोकरी लावतो, असे सांगून वेळोवेळी 21 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी  उलट बनावट धनादेश देऊन फसवणूक केली. याप्रकरणी विजयकुमार पाटील (संभाजीनगर, कोल्हापूर) तानाजी शामराव सोनाळकर (बाचणी, ता. कागल) आर. आर. कांबळे, (नानीबाई चिखली, ता. कागल) सुनील भाले, (वडणगे, ता. करवीर) यांच्याविरोधात अशोक हिंदुराव सातुसे (रा. साके, ता. कागल) यांनी कागल पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कलम 420, 468, 470 आणि 34 याप्रमाणे चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अशोक सातुसे  यांचा मुलगा अतुल हा पदवीधर तर मुलगी प्रियंका बी.ए. डी.एड. आहे. ते आपल्या मुलांना नोकरी लावण्याच्या प्रयत्नात होते. तानाजी सोनाळकर यांनी सुनील भाले, आर. आर. कांबळे या आपल्या मित्रांकरवी  नोकरी देतो, असे सांगितले. त्याने सुनील भाले यांनी मुलांना राज्य उत्पादन शुल्क खात्यामध्ये नोकरी लावतो, त्या मोबदल्यात सात लाख रुपये द्या. मंत्रालयांमध्ये माझ्या ओळखीचे अधिकारी आहेत, असे सांगितले. 

20 जून 2014 रोजी साके येथे सोनाळकर आला असता साडेपाच लाख रुपये देतो, असे सातुसे यांनी सांगितले. त्याच दिवशी जनावरे विकून 50 हजार रुपये सोनाळकर याला दिले. 1 जुलै 2014 ला दीड लाख रुपये तानाजी सोनाळकर यांना मित्र अजित भोसले यांच्या समक्ष दिले. पुणे या ठिकाणी शिवशाही हॉटेलमध्ये तानाजी सोनाळकर, सुनील भाले, आर. आर. कांबळे यांनी विजयकुमार पाटील याची ओळख करून दिली. आपण मंत्रालयात अधिकारी असल्याचे पाटील यांनी सांगितले. पूर्ण रकमेशिवाय काम होणार नसल्याचे पाटील यांनी सांगितल्यावर सातुसे यांनी तेथे एक लाख रुपये दिले. पुढील महिन्यात राज्य उत्पादन शुल्क ची ऑर्डर देतो, असे सांगितल्यानंतर एक महिन्याने शिवशाही हॉटेलमध्ये पुन्हा अडीच लाख रुपये सातुसे यांनी दिले. त्यानंतर नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर ऑर्डरवर सही, शिक्क्यासाठी पुन्हा एक लाख भरावे लागतील, असे सांगून ऑर्डरवर राजमुद्रा व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचा शिक्क्याची प्रत सातुसे यांना दिली. 

काही दिवसांनी कांबळे, भाले यांनी भारती विद्यापीठामध्ये डी.एड.च्या जागेवर मुलीला नोकरी लावतो, असे सांगत साडेतीन लाख रुपये घेतले. पुन्हा पुणे येथे जाऊन दोन टप्प्यांमध्ये साडेतीन लाख रुपये विजयकुमार पाटील यांना दिले. दोन महिन्यानंतरही नोकरीची ऑर्डर आली नाही. त्यामुळे फसवणुकीची खात्री झाल्यानंतर सातुसे यांनी कागल पोलिसांत तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक करचे करीत आहेत.

पत्नीच्या नावे चेक

सर्वजण कोल्हापुरातील विजय पाटील यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी तुमचे काम झाले नाही तर मी चेक देतो, असे सांगितले. पाटील यांनी पत्नी विजया यांच्या नावाचा साडेनऊ लाख रुपयांचा आयसीआयसीआय बँकेचा चेक दिला. तो चेक बाउन्स झाला. त्यामुळे सातुसे यांनी पाटील यांच्यावर चेक बाऊन्स खटला दाखल केला. दरम्यान, यातील सोनाळकर, भाले यांनी असे अनेक गैरप्रकार केल्याचे समजते.