Thu, Jun 27, 2019 10:09होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील 21 बंधारे अद्याप पाण्याखालीच

जिल्ह्यातील 21 बंधारे अद्याप पाण्याखालीच

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. धरणक्षेत्रात मात्र, चांगला पाऊस होत आहे. चंदगड तालुक्यातील जांबरे धरण आज सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरले. जिल्ह्यातील 21 बंधारे अद्याप पाण्याखालीच आहेत. पंचगंगेच्या पातळीत मात्र घट होत असून दिवसभरात दोन फुटांनी पाणी पातळी कमी झाल्याने पात्राबाहेर पडलेली पंचगंगा पुन्हा पात्रात गेली आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला होता. शनिवारी दुपारपासून अनेक भागांत पावसाची संततधार सुरू झाली आहे. शहर आणि परिसरातही अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. गेल्या 24 तासांत जांबरे धरणासह राधानगरी, पाटगाव आणि घटप्रभा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. दमदार पावसाने 0.82 टी.एम.सी. क्षमतेचे जांबरे धरण सायंकाळी पाचच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. त्याच्या सांडव्यातून विसर्ग सुरू आहे. यापूर्वी घटप्रभा आणि कोदे ही दोन धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

जिल्ह्यातील 21 बंधार्‍यांवर पाणी आहे. यामुळे त्यावरील वाहतूक बंदच आहे. पंचगंगेची पातळी 30.5 फुटांपर्यंत गेली होती. शुक्रवारी रात्रीपासून पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. मात्र, जिल्ह्याच्या हातकणंगले, शिरोळ तालुक्यात पंचगंगेची पातळी वाढू लागली आहे. आज सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी 29.10 फुटांवर होती. रात्री आठ वाजता ती 27.10 फुटांपर्यंत खाली आली होती. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 16.59 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात 45.83 मि.मी.इतका नोंदवला गेला. शाहूवाडीत 35.33 मि.मी., गगनबावड्यात 32 मि.मी., भुदरगडमध्ये 24.20 मि.मी., आजर्‍यात 20.25 मि.मी., राधानगरीत 18.33 मि.मी., पन्हाळ्यात 8.43मि.मी., कागलमध्ये 5.37 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 4.42 मि.मी., करवीरमध्ये 3 मि.मी. तर हातकणंगलेत 1.75 मि.मी. पावसाची नोंद झाली.

धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण 45 टक्के भरले आहे. तुळशी 55 टक्के, वारणा 56 टक्के, दूधगंगा 41 टक्के, कासारी 55 टक्के, कडवी 66 टक्के, कुंभी 58 टक्के, पाटगाव 51 टक्के, चित्री 36 टक्के तर जंगमहट्टी 41 टक्के भरले आहे. केवळ चिकोत्रा धरणात अद्याप 13 टक्केच पाणीसाठा झाला आहे.