Mon, Jul 22, 2019 00:37होमपेज › Kolhapur › दोन टोळ्यांतील १९ गुंडांना लवकरच ‘मोका’

दोन टोळ्यांतील १९ गुंडांना लवकरच ‘मोका’

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 27 2018 10:54PMकोल्हापूर : प्रतिनिधी

राजकीय पार्श्‍वभूमी आणि गंभीर गुन्ह्यांच्या रेकॉर्डवरील येथील दोन सराईत टोळ्यांचे म्होरके व  त्याचे साथीदार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोका) कायद्यांतर्गत कारवाईच्या ‘रडार’वर आहेत. 19 जणांविरुद्ध ‘मोका’ कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी सांगितले. त्यावर आठवड्यात निर्णय शक्य आहे, असेही ते म्हणाले.

अवैध व्यवसायाशी संबंधित इचलकरंजी, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, पेठवडगाव, कागल परिसरातील 15 जणांवर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.   संघटित टोळ्यांची गुंडागर्दी मोडीत काढण्यासाठी शहरासह जिल्ह्यात पाच सराईत टोळ्यांतील किमान 48 जणांवर ‘मोका’ कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तर 70 पेक्षा अधिक जणांना तडीपार करण्यात आले आहे. 

खंडणी वसुली, गर्दी, मारामारी, अपहरणासह घातक शस्त्रांच्या धाकावर दहशत माजविणार्‍या येथील दोन स्थानिक टोळ्यांविरुद्ध ‘मोका’ कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये राजारामपुरी परिसरातील एका मटकाबुकीचाही समावेश आहे.

क्रिकेट बेटिंगप्रकरणी कारवाईचा अहवाल मागविला

क्रिकेट बेटिंगप्रकरणी जिल्ह्यात झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने तातडीने अहवाल मागविण्यात आला आहे. संशयितावरील कठोर कारवाईबाबत दोन दिवसांत निर्णय होईल. कारवाई झालेल्यांत दोनपेक्षा अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या सराईतांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात येईल, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.