Thu, Aug 22, 2019 15:29होमपेज › Kolhapur › कोल्हापूर ‘स्वच्छते’साठी तब्बल 188 कोटी

कोल्हापूर ‘स्वच्छते’साठी तब्बल 188 कोटी

Published On: May 16 2019 2:05AM | Last Updated: May 16 2019 1:56AM
कोल्हापूर : सतीश सरीकर

स्थानिक स्वराज्य संस्था रस्ते, गटार, दिवाबत्ती आदींना प्राधान्य देत मूलभूत सुविधांची कामे करतात. परंतु, सांडपाणी व्यवस्थापन, कचर्‍याची विल्हेवाट यासाठी निधी राखून ठेवत नाहीत. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर होत आहे. परिणामी, राज्य शासनाच्या पर्यावरण खात्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना भांडवली बजेटमधील 25 टक्के निधी पर्यावरणासाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार कोल्हापूर महापालिका प्रशासनाने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी पर्यावरणासाठी तब्बल 188 कोटी निधीची तरतूद केली आहे. अशाप्रकारे कोल्हापूरच्या स्वच्छतेसाठी हा निधी राखीव ठेवला आहे.

पर्यावरणीय कामात सांडपाणी व्यवस्थापन, ड्रेनेज लाईन, नाला व जलनिस्सारण, नाल्यामुळे पंचगंगा नदीचे होणारे प्रदूषण थांबविणे, भुयारी मल्लनिस्सारण योजना, रंकाळा तलाव संवर्धन, रंकाळा तलाव विकास ड्रेनेज लाईन, पंचगंगा प्रदूषण थांबविणे, दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अमृत अभियानांतर्गत विविध कामे, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा संकलन व वाहतूक आदींसह इतर कामांचा समावेश आहे. 

रस्ते, गटार, दिवाबत्तीबरोबरच सांडपाणी व कचरा हे प्रश्‍नही स्थानिक पातळीवरीलच असतात. त्याबरोबरच सांडपाणी व्यवस्थापन व कचर्‍याची विल्हेवाट लावणे ही कामेही स्थानिक स्वराज्य संस्थांचीच आहेत. परंतु, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था या केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान किंवा निधीवर अवलंबून राहतात. पर्यावरणविषयक उदासीनताच त्याला कारणीभूत असते. त्यामुळे राज्य शासनाने पर्यावरणासाठी निधी राखीव ठेवणे बंधनकारक केले आहे. जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वबळावर घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन ही कामे करावीत, अशी अपेक्षा आहे. यात स्ट्रॉर्म वॉटरचा समावेश केलेला नाही. त्यासाठी राज्य व केंद्राच्या निधीवर अवलंबून राहू नये, यासाठी तरतूद करण्याचे आदेश दिले आहेत. 

देशातील दहा प्रदूषित नद्यांमध्ये कोल्हापुरातील पंचगंगेचा समावेश आहे. त्यामुळे सध्या पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्‍न जोरात चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांपासून पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर महापालिकेने त्यात सर्वाधिक पुढाकार घेतल्याचे वास्तव आहे. महापालिकेने लाईन बझार येथे 74 एम. एल. डी. क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प साकारला आहे. दुधाळी नाल्यावरही सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार झाले आहे. त्याबरोबरच सांडपाणी रोखण्यासाठी इतरही पर्याय अवलंबले जात आहेत. मात्र, सांडपाणी पूर्ण रोखण्यात अद्याप यश आलेले नाही, हेही वास्तव आहे. तसेच शहरातील कचर्‍याचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. कचर्‍यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच नसल्याने लाईन बझारमधील झूम प्रकल्पावर तब्बल पाच लाख टनावर कचर्‍याचा डोंगर तयार झाला आहे. शहरात रोज जमा होणार्‍या सुमारे 180 टन कचर्‍यापासून वीज निर्मितीसाठी खासगी ठेकेदाराला ठेका दिला आहे. परंतु, हे काम रडतखडतच सुरू आहे. पूर्ण क्षमतेने प्रकल्प कधी सुरू होईल, हे अधिकारीही ठामपणे सांगू शकत नाहीत. कोल्हापूरचे वैभव असलेला ऐतिहासिक रंकाळा तलावही मरणासन्‍न अवस्थेतून जात आहे. या तलावाचे संवर्धन व विकास करणे आवश्यक आहे.