Mon, Jun 24, 2019 16:36होमपेज › Kolhapur › आरामबस उलटून १७ प्रवासी जखमी

आरामबस उलटून १७ प्रवासी जखमी

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 11 2018 12:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

रत्नागिरी महामार्गावरील आंबवडेनजीक (ता. पन्हाळा)वळणावर चालकाचा ताबा सुटून खासगी आरामबस उलटून 17 प्रवासी जखमी झाले. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलचे 1978 च्या बॅचचे विद्यार्थी असून, पर्यटनासाठी पन्हाळा येथे ते आले होते. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रवींद्र गणपतदास शेठ (वय 54), केतन गोविंद महाजनी (54), राधिका मोहन तक (55), विनोद बळवंत गोडबोले (52), मुकुंद विनायक मोघे (54), नलिनी विलास पोवार (54, सर्व रा. सातारा), प्रशांत मनोहर कुलकर्णी (54), रिता राजेंद्र चिटणीस (55), विजय वसंत कुलकर्णी (55, रा. पुणे), अनुश्री चैतन्य चिरमुले (55), शिवानंद मधुकर देशपांडे (56), विवेक नेवाळकर (55), दिनेश पेंढारकर (34, रा. मुंबई), नितीन बुधकर (56, नाशिक), अंजली देशमुख (54, बंगळूर), सुप्रिया फडणीस, उमेश कुलकर्णी (रा. पुणे) अशी जखमींची नावे आहेत. जखमींमध्ये डॉक्टर, इंजिनिअर, बँक अधिकारी यांचा समावेश आहे.

सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलचे 1977-78 च्या बॅचचे माजी विद्यार्थी गेली चार वर्षे स्नेहमेळाव्याचे आयोजन करतात. यावर्षी जोतिबा, पन्हाळा पर्यटनासाठी शनिवारी सर्व जण सातारहून कोल्हापूरला आले होते. 40 जणांसाठी सातारमधील खासगी आरामबसने शनिवारी जोतिबा दर्शनानंतर सर्व जण पन्हाळा येेथे आले. पन्हाळ्याहून दुपारी सातार्‍याकडे जाण्यास ते बाहेर पडले. राष्ट्रीय महामार्गाकडे जाणार असल्याने बोरपाडळे फाट्याकडे येत असताना आंबवडे गावाजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटून आरामबस पलटी झाली. जखमींना बांबवडे आणि जोतिबा येथील 108 रुग्णवाहिकांच्या मदतीने सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले.

दोन तास वाहतूक ठप्प

आंबवडे येथे आरामबस रस्त्यालगत पलटी झाली. जखमींना मदत करण्यासाठी रस्त्यावर जाणार्‍या वाहनधारकांनीही धाव घेतली. जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेकांनी मदत केली. अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.