Thu, Jul 18, 2019 16:28होमपेज › Kolhapur › 17 प्रकरणे कर्जदारांच्या सह्याविना

17 प्रकरणे कर्जदारांच्या सह्याविना

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 12:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारणाच्या 30 प्रकरणांपैकी 17 प्रकरणांवर कर्जदारांच्या सह्याच नसल्याचे बँकेने केलेल्या तपासणीत उघड झाले. बँकेचे वरिष्ठ अधिकारी आर. जे. पाटील यांनी ही तपासणी केली. कर्जदारांच्या सह्या नसल्याने हे कर्जदार खरे की खोटे, याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेत तारण ठेवलेले खरे सोने हडप करून, त्याजागी बनावट सोने ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. या शाखेतून 32 लाख रुपये किमतीचे सुमारे 100 तोळे खरे सोने हडप करून त्याऐवजी बनावट सोने ठेवले आहे. याप्रकरणी बँकेने दिलेल्या फिर्यादीवर शाखाधिकारी संभाजी पाटील, कॅशिअर परशुराम नाईक व सराफ सन्मुख ढेरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यातील पाटील व नाईक यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

या प्रकारानंतर बँकेचे वरिष्ठ अधिकारी पाटील यांनी सर्व 30 प्रकरणांची नव्याने तपासणी केली. त्यापैकी दोन प्रकरणांतील सोने खरे आढळले. उर्वरित 28 प्रकरणांतील सोने बनावट निघाले. त्यातही 17 प्रकरणांत कर्जदारांच्या सह्याच नाहीत. सोने तारण करण्यासाठी कर्जदार आल्यानंतर त्याच्या समक्षच सोन्याचा टंच पाहून त्याचे मूल्यांकन केले जाते. त्यानंतर कर्जाची रक्कम देण्यापूर्वी हे सोने पिशवीत ठेवून त्यावर चिकटवलेल्या कागदावर कर्जदारासह सराफ, शाखाधिकारी, कॅशिअर यांच्या सह्या घेतल्या जातात. 17 प्रकरणा.त कर्जदारांच्या सह्याच नसल्याने खरोखर ते कर्जदार आहेत की त्यांच्या नावांवर दुसर्‍याचे सोने ठेवून ते हडप केले आहे का, याची चौकशीही बँकेने सुरू केली आहे. 

कसबा बावडा येथील शाखेतून 27 प्रकरणांतील 32 लाख रुपये किमतीचे खरे सोने हडप करून बनावट सोने लॉकरमध्ये ठेवल्याप्रकरणी शाखाधिकार्‍यासह तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पाटील व नाईक या दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संशयितांना दुपारी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. फसवणूकप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत दोषी ठरणार्‍यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तपास अधिकारी तथा ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

शाखाधिकारी, कॅशिअरला पोलिस कोठडी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कसबा बावडा शाखेचा निलंबित शाखाधिकारी संभाजी पाटील, कॅशिअर परशुराम नाईक या दोघांना मुख्य न्याय दंडाधिकार्‍यांनी शुक्रवारी सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. बँकेच्या पॅनेलवरील सराफ सन्मुख ढेरे याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.