Fri, Nov 16, 2018 06:35होमपेज › Kolhapur › निवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरी 16 लाखांची चोरी

निवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरी 16 लाखांची चोरी

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 09 2018 2:12AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील निवृत्त पोलिस निरीक्षक दुडाप्पा सत्यप्पा जोडगुद्री यांच्या राहत्या घरी 7 सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्याने कडीकोयंडा उचकटून रोख 5 लाख 65 हजार व 10 लाखांचे दागिने लंपास केले. एवढ्या मोठ्या चोरीमुळे हलकर्णी परिसरात खळबळ उडाली आहे. यातील फिर्यादी हे पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले असून, ते कुटुंबीयांसह आपल्या कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. चोरट्यांनी पाळत ठेवून याच दिवशी रात्री घराचा कडीकोयंडा तोडून घरातील रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्‍ला मारला आहे.

यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, मोहनहार, श्रीमंतहार, पाटल्या, बांगड्या, तोडे,  सोन्याचे कडे, चार कुडी जोड, चेन, सोन्याचे कॉईन, सोन्याची बिस्किटे, नऊ अंगठ्या, नेकलेस यासह अन्य चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्‍ला मारला आहे. जोडगुद्री यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणार्‍या अरुण दादू कागिनकर व श्रीकांत भीमराव नाईक या दोन लोकांच्या घरीही अशाचप्रकारे चोरी झाली असून, यातील नाईक हे गोवा पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले  आहेत तर अन्य एक जण मुंबई येथे काम करतात. ते दोघेही अद्याप बसर्गे येथे आले नसल्याने त्यांच्या घरातून नेमका किती ऐवज गेला, याची माहिती मिळू शकली नाही.

घरफोडीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी श्‍वानपथक बोलावले होते. श्‍वानाने घरापासून रस्त्यापर्यंत माग काढला. त्यानंतर मात्र चोरटे गाडीतून पसार झाल्याने श्‍वान त्या ठिकाणी घुटमळत राहिले. घटनास्थळावर ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. ठसेतज्ज्ञांनी घरातील चोरीच्या ठिकाणाहून ठसे गोळा करण्याचे काम केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने पोलिसांनी तातडीने तपासासाठी कर्नाटकात पथके रवाना केली असून, अन्य दोघांच्या घरात अशाच प्रकारची घरफोडी झाल्याने ते आल्यानंतर त्यांच्या घरातून नेमका किती रुपयांचा माल गेला आहे, हे ते दोघे घरी आल्यानंतरच कळणार आहे. यापूर्वीही बसर्गेमध्ये घरफोडी झाल्या असून, शुक्रवारी झालेली घरफोडी पाळत ठेवूनच चोरट्यांनी केली आहे.