कोल्हापूर : आणखी 16 कोरोनाग्रस्त, एकूण संख्या 623 वर

Last Updated: Jun 02 2020 1:04AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याला नव्या महिन्याचा पहिला दिवस दिलासादायक ठरला. सोमवारी सायंकाळपर्यंत 58 जण कोरोनामुक्‍त होऊन रुग्णालयातून घरी परतले, तर दिवसभरात 16 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले. यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 195 वर, तर बाधितांची एकूण संख्या 623 वर गेली.

गेल्या 20 दिवसांपासून जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. आणूर (ता. कागल) येथील एक तरुण वगळता या 20 दिवसांत आढळलेले 594 कोरोनाबाधित हे सर्व मुंबई, पुणे, सोलापूर या रेड झोनमधून आलेले आहेत. दि. 3 मेनंतर रेड झोनमधून मोठ्या प्रमाणात नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाने रेड झोनमधून येणार्‍या प्रत्येकाचा स्वॅब बंधनकारक केला होता. परिणामी, दररोज हजार ते दीड हजार जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. आता लक्षणे असलेल्यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. यामुळे दररोज 300 ते 400 स्वॅब तपासणीसाठी पाठवले जात आहेत. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ  लागली आहे.

दररोज 40-50 अहवाल पॉझिटिव्ह येत असताना, आज दिवसभरात मात्र  16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शाहूवाडीतील 10 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. मलकापूर येथील 63 वर्षीय वृद्धाचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या पत्नीचाही स्वॅब घेण्यात येणार आहे. शाहूवाडीतीलच आणखी एका 35 वर्षीय व्यक्‍तीला कोरोनाची लागण झाली आहे. 

शाहूवाडीत आज आणखी तीन रुग्ण आढळल्याने शाहूवाडी तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 164 वर गेली. आजरा तालुक्यातही आज आणखी एक रुग्ण आढळून आला. हरपवडे येथील 54 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आजरा तालुक्यातील बाधितांची संख्या 51 वर गेली आहे.

कोल्हापूर शहरातील सुभाषनगर परिसरातील 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईहून आलेला हा तरुण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये होता. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हा तरुण बांधकाम क्षेत्रात कामाला आहे. ठाणे येथून तो दि. 28 मे रोजी चिंचवड (पुणे) पर्यंत टेम्पोतून आला होता. त्यानंतर सुमारे दहा किलोमीटर पायी प्रवास करत नंतर एका वाहनाने तो कोल्हापुरात तावडे हॉटेलपर्यंत आला. तो सुभाषनगर परिसरात असलेल्या त्याच्या घरी येणार होता. मात्र, स्थानिक  नगरसेवक भूपाल शेटे यांनी त्याला घरी येण्याऐवजी क्‍वारंटाईनमध्येच राहण्याचा सल्‍ला दिला. हा परिसर दाट घरांचा आहे, तो जर घरी आला असता, तर मोठा धोका निर्माण झाला असता. क्‍वारंटाईनमध्ये असताना त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला.

चंदगडमध्ये नवे दहा रुग्ण

रात्री उशिरा आणखी 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये सर्वाधिक दहा रुग्ण चंदगड तालुक्यातील आहेत. यामध्ये सात पुरुष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. यामुळे चंदगड तालुक्यातील रुग्णसंख्या 71 वर गेली आहे. आजरा तालुक्यातील 23 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात तब्बल 58 जण कोरोनामुक्‍त झाले. उपचार घेऊन पूर्ण बरे झालेल्या या सर्वांना सोमवारी रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. यामुळे बरे होऊन घरी गेलेल्यांची जिल्ह्यातील संख्या 195 वर गेली. सहाजणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित 411 जणांवर सीपीआरसह जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार घेणार्‍यांपैकी 12 जणांची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

तालुकानिहाय एकूण रुग्णसंख्या

आजरा - 52, भुदरगड - 63, चंदगड - 71, गडहिंग्लज - 67, गगनबावडा - 6, हातकणंगले - 6, कागल - 51, करवीर - 12, पन्हाळा - 24, राधानगरी - 63, शाहूवाडी - 164, शिरोळ - 7, नगरपालिका क्षेत्र - 11, महापालिका क्षेत्र - 21, इतर - 7, एकूण - 623.