होमपेज › Kolhapur › प्रतीक्षा कर्जमाफीच्या १५० कोटी रुपयांची

प्रतीक्षा कर्जमाफीच्या १५० कोटी रुपयांची

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 12:04AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत 159 कोटींच्या कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानासाठी 84 हजार 90 शेतकर्‍यांची यादी पाठवली. या यादीतील शेतकर्‍यांच्या अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यानुसार जिल्हा बँक व सहकार खात्याचे अधिकारी छाननीच्या कामात गुंतले आहेत. बहुतांश अर्जांची छाननी करून माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे; पात्र लाभार्थ्यांना शिल्‍लक रकमेतील 8 कोटी 25 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही 150 कोटींची रक्‍कम येणे बाकी आहे. 

शेतकरी कर्जमाफीत शुक्रवारी चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्ह्यातील 12 हजार 868 थकबाकीदारांचा समावेश असून, त्यांना 45 कोटी 22 लाख रुपये मिळणार आहेत. तर 71 हजार 222 शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदानापोटी 113 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. शासनाकडून जिल्हा बँकांना या 84 हजार शेतकर्‍यांची यादी पाठवण्यात आली असून, यातील त्रुटी दूर करून पुन्हा ही माहिती अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा बँकेत शुक्रवारपासून यादीतील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू होते. 

प्राप्‍त यादीतील छाननी झालेल्या अर्जदारांना कर्जमाफीत आत्तापर्यंत आलेल्या व वाटप न झालेल्या 8 कोटी 25 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. यामध्ये 5239 शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदानापोटी 7 कोटी 48 लाख रुपये देण्यात आले. तर 164 थकबाकीदारांना 77 लाख रुपये देण्यात आले आहेत.