Sun, Aug 18, 2019 20:35होमपेज › Kolhapur › गारगोटी मारामारीप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल

गारगोटी मारामारीप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 10:56PMगारगोटी : प्रतिनिधी

गारगोटी ग्रामपंचायतीमधील राजकारणावरून झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी भुदरगड पोलिसांत सत्ताधारी, विरोधी गटाकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने दोन्ही गटांच्या 15 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सरपंच, विद्यमान दोन सदस्य, ग्रामविकास अधिकार्‍यांचा समावेश आहे.  शहरातील कायदा व सुव्यस्था बिघडविण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिला.

सरपंच संदेश भोपळे यांच्यासह चौघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

यावेळी आसिफा फिरोज खान (रा. कळंबा, करवीर) हिने भुदरगड पोलिसांत सरपंच संदेश भोपळे, ग्रामविकास अधिकारी जालेंद्र बुवा, सदस्य प्रकाश वास्कर, सनी परीट यांच्याविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आसिफा खान हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडील ताजुद्दीन गोलंदाज यांचे टेंबलाबाई चौकात दुकान आहे. हे दुकान अतिक्रमणमध्ये असल्याचे सांगून ग्रामपंचायतीने दुकानातील साहित्य हलवून 14 हजार रुपयांचा दंड केला. याची विचारणा करण्यास ग्रामपंचायतीमध्ये वडील, पती व मी स्वत: गेले असता सरपंच संदेश भोपळे यांनी, तू छान दिसतेस, आम्हा सर्वांना खूश कर, तुझ्या वडिलांचा दंड रद्द करतो व दुकानाचे साहित्य परत करतो, असे शब्द उच्चारून मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून वडील व पतीस मारहाण केल्याची साक्ष पोलिसांत दिल्याने सरपंच, ग्रामविकास अधिकारी, सदस्यांसह चौघांविरोधात भुदरगड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

गारगोटी सरपंच व सत्ताधारी सदस्यांची सर्वसामान्य नागरिकांवर अरेरावी : माजी उपसरपंच शिंदे

गारगोटी ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंच संदेश भोपळे, तसेच सत्ताधारी मंडळीचे सदस्य यांनी सर्वसामान्य नागरिकांवर हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू केला आहे. शनिवारचा ग्रामपंचायतीमध्ये घडलेला सर्व वृत्तांत खोटा व दिशाभूल करणारा असल्याची माहिती अरुण शिंदे यांनी दिली आहे.