Mon, May 27, 2019 01:31होमपेज › Kolhapur › मूल्यांकन 1300 शाळांचे, पात्र केवळ 146

मूल्यांकन 1300 शाळांचे, पात्र केवळ 146

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 07 2018 12:48AMभडगाव : वार्ताहर

सतरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची अनुदानास पात्र यादी शासनाने घोषित केली असली, तरी मूल्यांकन झालेल्या राज्यातील सुमारे 1300 प्रस्तावांपैकी 123 कनिष्ठ महाविद्यालय व 23 तुकड्या अशा केवळ 146 ज्युनिअर कॉलेजना अनुदानपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे ही यादी घोषित होताच शिक्षक पालक व संस्थाचालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मूल्यांकन झालेल्या सर्व 1300 ज्युनिअर कॉलेजची अनुदान यादी जाहीर केल्याशिवाय विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी कामावर बहिष्कार कायम ठेवला  आहे. 

सन 2001 साली शासनाने कायम विनाअनुदानित तत्त्वावर कनिष्ठ महाविद्यालयांना परवानगी दिली. त्यामुळे ग्रामीणसह शहरामध्ये ज्युनिअर कॉलजेची संख्या वाढली. शिक्षणाची सोय झाली; पण या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सतरा वर्षे विनावेतन हजारो शिक्षक भविष्यात पगार मिळेल, या आशेवर अध्यापनाचे काम करत आहेत. सततची शेकडो आंदोलने, मोर्चे, उपोषणे केल्यानंतर शासनाने विधानसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून 26 फेब्रुवारी 2014 रोजी या कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालरांचा कायम शब्द वगळून अनुदान देण्याचे आश्‍वासन दिले. तर 4 जून 2014 रोजी या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी मूल्यांकनाचे निकष लागू करून राज्यातील संबंधित विभागात छानणी करून पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयात राज्यातील सुमारे 1300 कनिष्ठ महाविद्यालये व तुकड्यांचे प्रस्ताव सादर झाले होते. त्यापैकी किमान 900 कनिष्ठ महाविद्यालये अनुदानास पात्र होणे गरजेचे असताना, तसे न होता अल्प प्रस्तावांची यादी जाहीर झाली तर प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यास दिरंगाई होत होती. परिणामी, अनेक वेळा शिक्षकांनी आंदोलन, मोर्चे, उपोषण केल्यानंतर अखेर 22 डिसेंबर 2017 रोजी शासनाला प्रस्तावांची यादी प्राप्त झाली असून छानणी झालेल्या 1300 प्रस्तावांची पूर्ण यादी शासनाने जाहीर करणे गरजेचे होते; पण यादी जाहीर केल्यानंतर या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे लागणार. त्यामुळे शासन या विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची अनुदानपात्र यादी जाहीर करण्यास दिरंगाई करत आहे, अशा भावना शिक्षण क्षेत्रातून उमटत आहेत. 

दरम्यान, नागपूर हिवाळी आधिवेशनच्या वेळी शिक्षण विभागाला मूल्यांकन झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची अनुदानपात्र यादी प्राप्त झाली होती. शिक्षणमंत्र्यांनी यादी जाहीर करण्याचे आश्‍वासन दिले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून बारावी पेपर तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने अनुदानपात्र कनिष्ठ महाविद्यालयांची अपुरी यादी जाहीर केली आहे, तर ही यादी अपुरी असल्याने शिक्षकांनी आंदोलन कायम ठेवले आहे.