होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात 120 लाख क्विंटल साखरेची निर्मिती

जिल्ह्यात 120 लाख क्विंटल साखरेची निर्मिती

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 14 2018 1:01AMहमीदवाडा : मधुकर भोसले

जिल्ह्यात गळीत हंगाम उत्तरार्धात आलेला असताना आतापर्यंत 119 लाख 99 हजार 678 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यासाठी 98 लाख 82 हजार 78 मे. टन ऊस गाळप करण्यात आला आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 12.14 आहे. तर कारखाना पातळीवर उतार्‍यामध्ये दत्त दालमिया आसुर्ले - पोर्ले हा कारखाना अव्वल आहे. तर ऊस गाळप व साखर उत्पादनात जवाहर सहकारी साखर कारखाना सर्वात आघाडीवर आहे. या हंगामासाठी जिल्ह्यातील खासगी व सहकारी मिळून 22 कारखान्यांनी गाळप सुरू ठेवले आहे. तर दौलत सहकारी साखर कारखान्याचे धुराडेच यावेळी पेटले नाही. 

चालू गळीत हंगामामध्ये सध्या 13.07 उतार्‍याने दालमिया प्रथम, 12.72 उतार्‍याने गुरुदत्त तर 12.68 उतार्‍यासह बिद्री सहकारी साखर कारखाना तिसर्‍या क्रमांकावर आहे. उतार्‍यात पहिल्या दोन क्रमांकाचे कारखाने हे खासगी आहेत. साखर उत्पादनात 12 लाख 80 हजार 610 क्विंटल साखर निर्मिती करून जवाहर सहकारी साखर कारखाना अव्वल आहे. तर 9 लाख 923 क्विंटल साखर निर्मितीने दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ हा दुसर्‍या स्थानावर आहे. तिसर्‍या स्थानावर आसुर्ले - पोर्ले येथील दत्त दालमिया हा कारखाना असून या कारखान्याने 9 लाख 350 क्विंटल इतकी साखर उत्पादित केली आहे. 

यावर्षीच्या हंगामात 22 पैकी 7 कारखाने हे खासगी आहेत व उर्वरित 15 सहकारी आहेत. जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांनी 70 लाख 14 हजार 831 मे. टन उसाचे गाळप केले असून 84 लाख 48 हजार 368 क्विंटल साखर उत्पादित केली आहे. तर जिल्ह्यात खासगी कारखान्यांनी 28 लाख 67 हजार 247 मे. टन ऊस गाळप करून 35 लाख 51 हजार 310 क्विंटल एवढी साखर निर्माण केली आहे. 

सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 12.04 इतका आहे. तर खासगी कारखान्यांचा साखर उतारा 12.39 टक्के इतका आहे. व दोन्ही मिळून सरासरी 
साखर उतारा हा 12.14 टक्के इतका आहे. 

जिल्ह्यामध्ये 13 च्या वरती उतारा असणारा दालमिया हा एकच कारखाना सध्यातरी आहे. गाळपात प्रथम क्रमांक असणार्‍या जवाहर साखर कारखान्याने दहा लाख 49 हजार 900 मे. टन उसाचे गाळप केले आहे. तर दत्त शिरोळ साखर कारखान्याने 7 लाख 57 हजार 610 इतके गाळप केले आहे. उत्पादनात तिसर्‍या क्रमांकावर असणार्‍या दालमिया कारखान्याने 6 लाख 88 हजार 865 मे. टन उसाचे गाळप केले आहे. यामध्ये तात्यासाहेब कोरे या कारखान्याने 7 लाख 65 हजार 200 मे. टन उसाचे गाळप केले असून 8 लाख 96 हजार 800 क्विंटल इतकी साखर निर्माण केली आहे. त्या खालोखाल सरसेनापती घोरपडे साखर कारखान्याने 5 लाख 89 हजार 530 मे. टन उसाचे गाळप केले असून 7 लाख 17 हजार 95 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.