Fri, Mar 22, 2019 07:41होमपेज › Kolhapur › पाच महिन्यांत १२० घरफोड्या 

पाच महिन्यांत १२० घरफोड्या 

Published On: Jul 09 2018 1:18AM | Last Updated: Jul 09 2018 12:22AMकोल्हापूर : गौरव डोंगरे

शहरातील अपार्टमेंटसह उपनगरांतील बंद बंगले, फ्लॅट सहज लक्ष्य केले जात आहेत. बोंद्रेनगर, आपटेनगर, कळंबा, फुलेवाडी, आर.के.नगर, पाचगाव यासह मध्यवर्ती भागातील रूईकर कॉलनी, टाकाळा, चिले कॉलनी, हनुमाननगर परिसरात घरफोड्यांचे प्रमाण अधिक आहे. मागील महिन्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या हाती लागलेल्या चोरट्याकडून तब्बल 40 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. त्याने दरवाजाची कडी तोडण्यासाठी, तसेच खिडकीचे गज वाकविण्यासाठी वापरलेल्या हायड्रॉलिक जॅकच्या वापरामुळे पोलिसही चक्रावले. 

चोरटे अगदी सहजरीत्या पोलिसांना गुंगारा देत आहेत. दोन दिवसांपूर्वी शाहूपुरी परिसरात सशस्त्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला. हातात शस्त्र असणारे चार चोरटे शाहूपुरी, विचारेमाळ, रेल्वेस्थानक परिसरातून शिवाजी पुलाकडे गेल्याचे चित्रीकरण मिळाले आहे. यामुळे चोरटे बाहेरगावाहून येऊन हात साफ करून निघून जात असल्याचे समोर आले आहे. 

डी.बी. पथकांची पुनर्रचना कधी?

कोल्हापूर पोलिस दलातील डी.बी. पथके (गुन्हे प्रकटीकरण) ही गुन्हेगारांच्या मनात धडकी भरविणारी होती. अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करणारे अनुभवी पोलिस डी.बी. पथकात काम करत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत पोलिस ठाण्यांकडील डी.बी. पथकांकडून उल्लेखनीय कामगिरी घडलेली नाही. शहरातील अनेक लहान-मोठे गुन्हे उघडकीस आणण्याचे काम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) करावे लागते. यामुळे डी.बी. पथके नेमकी करतात तरी काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

परप्रांतीय चोरट्यांचा सहभाग

रेल्वे फाटक परिसरातील मोबाईल शोरूम फोडणारे चोरटे राजस्थानचे राहणारे असल्याचे तपासात पुढे आले. तर शिवाजी रोडवरील एका मोबाईल शॉपीमध्ये चोरी करणारे संशयितही परप्रांतीय आहेत. परप्रांतीय चोरट्यांकडून घडणार्‍या या चोर्‍यांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. हे चोरटे नोकरीच्या, मार्केटिंगच्या बहाण्याने शहरात राहत असतात. यामुळे नागरिकांनीही अशा परप्रांतीयांना खोली भाड्याने देताना पूर्ण खात्री करणे. संबंधित पोलिस ठाण्याला याची पूर्वकल्पना देणे बंधनकारक आहे.